मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाबाबत शेतकऱ्यांकडून मागविले आक्षेप
By Admin | Updated: September 29, 2015 23:42 IST2015-09-29T23:42:49+5:302015-09-29T23:42:49+5:30
मुंबई - बडोदा व्हाया पनवेल या द्रुतगती महामार्गासाठी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. या संदर्भात काही आक्षेप असतील तर

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाबाबत शेतकऱ्यांकडून मागविले आक्षेप
वाडा : मुंबई - बडोदा व्हाया पनवेल या द्रुतगती महामार्गासाठी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. या संदर्भात काही आक्षेप असतील तर ते लेखी स्वरूपात बाधीत शेतकऱ्यांनी सक्षम अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांकडे लेखी स्वरूपात पुराव्यासह दाखल करण्याची अधिसूचना जारी केल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतकऱ्यांनी या रस्त्याला तीव्र विरोध दर्शविला असून एक इंच जमिनीलाही हात लावू देणार नाही असा गंभीर इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा भोईर यांनी दिला आहे.
या द्रुतगती महामार्गाचे काम केंद्र सरकारने हाती घेतले असून हा रस्ता ३८० किलोमीटर अंतराचा आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, पालघर, वसई आणि वाडा तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यातून हा रस्ता पनवेलला जोडला जाणार आहे.
वाडा तालुक्यातील निबंवली, गोराड, केळठण लोहोपे व चांबळे या गावाच्या हद्दीतून हा रस्ता जाणार असून यामुळे सुमारे दोनशे शेतकरी बाधीत होणार आहेत. या शेतकऱ्यांनी आपले आक्षेप सक्षम अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कडे २३ दिवसात लेखी स्वरूपात करण्याची अधिसूचना जारी केल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. वाडा तालुक्यातील निबंवली गोराड हा परिसर दुर्गम म्हणून गणला जातो. यात आदिवासी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असून त्यातील काही शेतकरी तर भूमिहीन होणार आहेत. या नियोजित रस्त्यावर येणारी अनेक घरे असून त्यांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचीही विभागणी या रस्त्यामुळे होणार असून शेतीचे रस्तेही बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिसरासाठी लोहोपे बंधाऱ्यातून शेतीसाठी पाणी घेतले जाते. या रस्त्यामुळे शेतीचे दोन भाग होऊन शेतकऱ्यांची उन्हाळी शेतीचा प्रश्न ही बिकट होणार आहे. (वार्ताहर)