कल्याण-डोंबिवलीत ७५ टक्के नालेसफाईचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST2021-05-31T04:28:53+5:302021-05-31T04:28:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पावसाळा आला की नालेसफाईचा विषय नेहमीच चर्चेत असतो. दरवर्षी महापालिका हद्दीत कंत्राटदाराकडून नालेसफाईचे काम ...

कल्याण-डोंबिवलीत ७५ टक्के नालेसफाईचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पावसाळा आला की नालेसफाईचा विषय नेहमीच चर्चेत असतो. दरवर्षी महापालिका हद्दीत कंत्राटदाराकडून नालेसफाईचे काम केले जाते. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र पहिल्या पावसात नालेसफाईचे पितळ उघडे पडते. त्यामुळे यंदाच्या वर्षापासून नाल्यातून कंत्राटदार जितका गाळ काढणार त्याच्या वजनानुसार कंत्राटदाराला बिल दिले जाईल, असा पवित्रा आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे कंत्राटदार जास्तीत जास्त गाळ काढून नालेसफाईवर भर देत असल्याचे चित्र शहरांत दिसत आहे. आजपर्यंत नालेसफाईचे काम ७५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. उर्वरित २५ टक्के काम येत्या १० जूनपर्यंत पूर्ण केले जाईल. नालेसफाई केल्यावर काही ठिकाणी नाल्यातील गाळ नाल्याच्या शेजारी काढून ठेवण्यात आला होता. तो आता उचलला जात आहे. नालेसफाईच्या कामाची पाहणी दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली होती. योग्य प्रकारे काम झाले पाहिजे, अशा सूचना भोईर यांनी प्रशासनास दिल्या होत्या.
महापालिका हद्दीत दरवर्षी नालेसफाई केली जाते. कंत्राटदारामार्फत नालेसफाई करताना कामाचे व्हिडिओ शूटिंग केले जाते. प्रत्यक्षात शूटिंग दाखविल्यावर त्यांच्या नोंदी करून बिले काढली जातात. मात्र अनेकदा या शूटिंगमध्येही फसवणूक असू शकते. त्यामुळे यंदा व्हिडिओ शूटिंगनंतर बिलाच्या पद्धतीला आयुक्तांनी छेद दिला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कंत्राटदाराला बिल देताना त्याने किती गाळ काढला याचे मोजमाप होऊन बिल दिले जाणार आहे. महापालिकेने दहा प्रभागात दहा कंत्राटदारांना नालेसफाईचे काम विभागून दिले आहे.
महापालिका हद्दीत ९२ मोठे नाले आहेत. त्यांच्या सफाईच्या कामावर एकूण तीन कोटी २५ लाख खर्च होणार आहे. महापालिका हद्दीत कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. कोरोना लाटेचा फटका पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक कामांना बसू नये, असे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. या कॉन्फरन्सद्वारे आयुक्तांनी नालेसफाईचे काम तातडीने केले जावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेतील नालेसफाईच्या कामाला १ मेपासून सुरुवात झाली. आयुक्तांनी ९ मे रोजी कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी २० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता.
फोटो-कल्याण-नालेसफाई
---------------------