सदानंद नाईक, उल्हासनगर: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने शॉर्टटर्म पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करताच, शहरातील १७ सिंधी पाकिस्तानी नागरिकांनी पाकिस्तानकडे प्रयाण केले. तर लॉंगटर्म व्हिसा घेतलेले २५० सिंधी पाकिस्तानी नागरिक शहरांत राहत असून भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती उघड झाली. भारतीय सिंधू सभा त्यांना मदत करीत असल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी महेश सुखरामनी यांनी दिली.
काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर शॉर्टटर्म व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा भारत सरकारने रद्द केला. शहरांत शॉर्टटर्म व्हिसा घेऊन आलेल्या १७ पैकी १४ सिंधी पाकिस्तानी नागरिकांनी रविवारी तर उर्वरित ३ नागरिकांनी सोमवारी पाकिस्तानकडे प्रयाण केले. मात्र लॉंगटर्म व्हिसा घेतलेल्या सिंधी पाकिस्तानी नागरिकांची संख्या शहरात २५० पेक्षा जास्त असल्याची माहिती उघड झाली. त्यासर्वांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला असून त्यापैकी काही जण ८ ते १० वर्षापासून शहरांत राहत आहेत. तर १५० जणांना गेल्या ६ वर्षात भारतीय नागरिकत्व मिळाले.
देशाच्या फाळणी वेळी विस्थापित सिंधी बांधवासह अन्य समाज देशाच्या विविध विभागात वसला. शहरातील सिंधी समाजाचे नातेवाईक, भाऊ-बंधू आजही पाकिस्तान राहत आहेत. शहरातील सिंधी समाजाचे मूळ पाकिस्तान मध्ये असून नातेवाईक व भाऊबंधू तेथे असल्याने, त्यांची एकमेकांकडे सण व उत्सवा दरम्यान येणे-जाणे असते. भारतीय हिंदू सभेचे महेश सुखरामनी यांच्या म्हणण्यानुसार गेल्या ३० ते ४० वर्षात शहरातील ३ हजार पेक्षा जास्त सिंधी पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व मिळाले. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेला वैद्यकीय व्हिसा, दीर्घकालीन व्हिसा, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा वगळता इतर सर्व व्हिसा २७ एप्रिल २०२५ पासून तात्काळ रद्द केले आहे.
छळाच्या कहाण्या
जॅकेश ननजानी- जॅकेश यांच्या वडिलांचे पैश्यासाठी अपहरण झाल्यावर, पाकिस्तान मधील अल्पसंख्यावरील अन्यायाला वाचा फुटली. मुलांचे भवितव्य अंधारमय होऊ नये म्हणून जॅकेशच्या वडिलांनी कुटुंबासह लॉंग टर्म व्हिसा घेऊन भारत गाठले. जॅकेश यांच्या कुटुंबाला काही वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व मिळाले. मात्र त्यांचे अन्य नातेवाईक आजही पाकिस्तान आहेत.
दिलीप ऊतवानी- ऊतवानी यांच्या कुटुंबाचा बलूचिस्थान भागात कापड्याचा व्यवसाय होता. मात्र कुटुंबाला होत असलेल्या त्रासाच्या भीतीने, त्यांनी कुटुंबासह लॉंगटर्म व्हिसावर भारत गाठले. त्यांना गेल्याच वर्षी भारतीय नागरिकत्व मिळाले. त्यांचे नातेवाईकही पाकिस्तान असल्याचे दुःख आहे.