लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिवसेना फोडायचे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून पूर्ण केले, असा आरोप उद्धवसेनेचे नेते आणि खा. संजय राऊत यांनी रविवारी ठाण्यात केला. ठाण्यानेच नगरपालिकेतून शिवसेनेला सत्ता दिली. इतिहासाची पुनरावृत्ती हाेत असते. आता तीच पुनरावृत्ती हाेणार असून, पालिका निवडणुकीतूनच पुन्हा उद्धवसेनेलाच सत्ता मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्धवसेनेचा महाराष्ट्र कार्यकर्ता सुसंवाद मेळाव्याची सुरुवात रविवारी ठाण्यातून झाली. यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेना सुसंवाद मोहिमेची पहिली स्वारी ही ठाण्यावर आहे. आनंदाश्रमाजवळ शिंदेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या घाेषणाबाजीवर ते म्हणाले, गद्दारांना महिला पुढे करायची सवय असते.
निष्ठा काय असते, हे ठाणेकरांनी दाखवून दिले आहे. मशाल हीच खरी शिवसेना असून, ती लोकांच्या मनात बिंबवायची आहे.
ही तर त्यांची पाकीटमारी
हा संघर्षाचा काळही जाईल. त्यानंतर असा एक दिवस येईल की लोक शिंदेंनाही पकडून आणतील आणि म्हणतील की त्यांना पक्षात घेता का? असा टाेलाही राऊत यांनी लगावला. आम्ही तुम्हाला हलक्यातच घेतोय. या लोकांनी शिवसेना चोरली नाही तर ही पाकीटमारी आहे, असा मार्मिक टोला राऊत यांनी लगावला. या मेळाव्यात खासदार अरविंद सावंत, भास्कर जाधव, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खा. राजन विचारे, विनायक राऊत यांचीही भाषणे झाली.