नागरिकांची पालिकेवर धडक
By Admin | Updated: August 13, 2014 02:00 IST2014-08-13T02:00:38+5:302014-08-13T02:00:38+5:30
पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आज महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढला.

नागरिकांची पालिकेवर धडक
मुंबई : पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आज महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढला.
मालाड पूर्वेकडील काही भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याची समस्या उद्भवली असून त्याचा फटका ३० ते ३५ हजार नागरिकांना बसत आहे. याकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात
आहे. काही महिन्यांपूर्वी या परिसरात पाणी टंचाई उद्भवल्याने पालिकेकडून पाणीकपात करण्यात आली होती. त्यानंतर आनंदवाडी, लक्ष्मण नगर, कोकणी पाडा, दत्तवाडी परिसरात काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असल्याची, तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पाणी गढूळ येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे टॅँकरचे पाणी वापरून दिवस काढत असल्याचे येथील त्रस्त नागरिक किरण बिडीये यांनी सांगितले.
आमच्या लक्ष्मण नगरात जराही पाणी येत नसल्याने टॅँकरचे पाणी मागवावे लागत आहे. त्यात एकाच वेळी पाणी भरण्यासाठी सर्वांची झुंबड उडते. त्यामुळे बाजूच्या भागात जाऊन गढूळ पाणी आणावे लागत असल्याने रोगराईचे प्रमाण वाढले आहे. मुलांच्या आरोग्यावरही त्याचा मोठा दुष्परिणाम होत आहे, असे स्थानिक रहिवासी शीतल जैन यांनी सांगितले.
नागरिकांना अनेक महिने पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पालिकेकडून दोन दिवसांत पाण्याचा दाब वाढवण्यात येणार असून पाणीकपात पूर्णपणे बंद करण्यात येण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले. तसेच लक्ष्मण नगर येथे एक महिन्याच्या कालावधीत पाण्याची नवीन पाइपलाइन बसवण्याची हमी साहाय्यक पालिका आयुक्त देवेंद्र जैन यांनी या वेळी दिल्याचे नगरसेविका रूपाली रावराणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)