चित्रातलं गावसौंदर्य!

By Admin | Updated: February 5, 2017 03:08 IST2017-02-05T03:08:33+5:302017-02-05T03:08:33+5:30

दीपक पाटील यांनी आपल्या रंगजाणिवेतून ग्रामीण जीवन हुबेहूब साकारले असून, रंगमाध्यमाचा एक जिवंत आविष्कार त्यांनी कॅनव्हासवर साकारला आहे. या कलाकृतीने ग्रामीण

Chitrutla Gavsure Beauty! | चित्रातलं गावसौंदर्य!

चित्रातलं गावसौंदर्य!

- महेंद्र सुके

दीपक पाटील यांनी आपल्या रंगजाणिवेतून ग्रामीण जीवन हुबेहूब साकारले असून, रंगमाध्यमाचा एक जिवंत आविष्कार त्यांनी कॅनव्हासवर साकारला आहे. या कलाकृतीने ग्रामीण जीवनाचे सौंदर्य आखीवरेखीव पद्धतीने चितारले असून, आजवर अनेक प्रदर्शनात ही चित्रे बघून रसिक अवाक झाले आहेत.
दीपक पाटील यांचा जन्म धुळे जिल्हयातील कापडणे या गावात झाला असून, बालपणही तिथेच गेलÞे. आज शहरात आढळणारी समृद्धी, चैनवादी संस्कृती त्या छोट्या गावात नव्हती, पण निसर्गाची व नाते-संबधाची व कौटुंबिक जिव्हाळ्याची, हिरव्यागार शेताची व विविध ़ऋतुत येणाऱ्या फळांची फुलांची श्रीमंती त्यांनी पाहिली होती. अंधारात देवापुढे दिवा लावणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर पडलेला निरांजनाचा प्रकाश त्यांच्या अंतर्मनात घर करणारा ठरला होता. रोज सकाळी घरासमोर सडा टाकताना व नंतर रेखाटलेली रांगोळी रंगलेखकाच्या अनुभवांची समृद्धता आहे. या प्रदर्शनातील चित्रकलाकृती म्हणजे याच अनुभवविश्वाला कलावंताच्या अंतर्मनाने टिपलेला हा अविस्मरणीय असा देखणा कोलाज आहे. ग्रामीण जीवनात त्यांनी अनुभवलेली समृद्धता कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर साकारली आणि ती कलारसिकांना दाद मागणारी ठरली आहे.
दीपक पाटील यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन चित्रकलेचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर पुढील शिक्षण पुण्यात घेतले. नोकरीसाठी मुंबईजवळच्या खोपोली येथे कला महाविद्यालयात रूजू झाले व कालांतराने त्याच ठिकाणी प्राचार्य झाले. याच कालावधीमध्ये त्यांची चित्रनिर्मितीही सुरूच होतीÞ. राज्यातील प्रदर्शनासाठी चित्रे तयार करून पाठवणे, सहकलाकार मित्रांसोबत विविध कला दालनात प्रदर्शन भरवणे सुरू असताना त्यांची २०१०साली मुंबई येथील जगप्रसिद्ध
जहांगीर कलादालनात त्यांना पहिल्यांदा एकल प्रदर्शन भरवण्याची संधी मिळाली आणि जाणकार रसिकांनी त्यांच्या कलाकृतीचा गौरव केला.त्या नंतरत्यांची चित्रे वेगवेगळ्या प्रदर्शनातून आपला वेगळा ठसा उमटवत गेली आणि ती जगप्रसिद्ध झाली. या चित्रांमध्ये आपल्या लाडक्या तान्हुल्याला झोका देऊन निजवणारी व त्याचवेळेस तिच्या थोरल्या मुलीशी हितगुज करणारी गृहिणी, भीतीदायक सापळ्याला पाहून त्यालाच घाबरवणारी मुले, खेळण्याच्या कपाटात लपून बसलेली मुलगी, स्वत:ला झाशीची राणी समजून आजोबांच्या पाठीवर बसून खेळणारी नात, आरशात बघुन कुंकू लावणारी गृहिणी, पाण्याच्या ओढीने झऱ्यात पाय टाकुन बसलेली तरुणी, मनातला आनंद चेहऱ्यावर आणत स्मितहास्य करणारी स्त्री, सोन्यासारख्या पिकाची कापणी करण्यात रमलेले कुटुंब, उदरनिर्वाहासाठी आपला संपूर्ण संसारच सोबत घेऊन भटकंती करत असलेले धनगर, देवापुढे शांतपणे आपल्या मनातील भावना व्यक्त करणारी गृहिणी, हातातल्या सुपात समृद्धीरूपी धान्य घेऊन दारात उभी असलेली गृहिणी, प्रतीक्षा संपवून परतत असलेल्या सौभाग्याचे आनंदाने स्वागत करणारी गृहिणी, वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतातून घराकडे जाणाऱ्या बैलगाड्या, सकाळच्या वेळी देवाच्या दारातून देवपूजा आटपून बाहेर पडणारी स्त्री, पहाटेच्या वेळी मनोभावे पूजा करणारी मुलगी, माहेरी आलेल्या मुलीचा प्रेमाने साजशृंगार करणारी आई अशी असंख्य ग्रामीण सौंदर्यांने अलंकृत झालेली चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, प्रसिद्ध रंगलेखक दीपक पाटील यांनी अलीकडच्या काळात रेखाटलेल्या वास्तववादी चित्रांचे प्रदर्शन ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असणाऱ्या टाऊन हॉलमध्ये ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणारे हे प्रदर्शन कलारसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत नि:शुल्क बघता येईल.

Web Title: Chitrutla Gavsure Beauty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.