बालनाट्यांमध्ये बालमनाचा विचार गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:26 IST2020-11-21T00:26:13+5:302020-11-21T00:26:20+5:30
आशीष शेलार यांचे मत

बालनाट्यांमध्ये बालमनाचा विचार गरजेचा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘बालनाट्ये फक्त बालकलाकारांनीच सादर केली पाहिजेत असे नसून, बालप्रेक्षकांच्या मनाचा, वयाचा विचार करून सादर केलेले बालप्रेक्षकांसाठीचे नाटक म्हणजे बालनाट्य होय. असे सोहळे बालरंगभूमी सक्षम करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील. ही चळवळ फक्त ठाण्यापुरती मर्यादित न राहता ती राज्यव्यापी कशी होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत माजी शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी गंधार गौरव पुरस्कार सोहळ्यावेळी व्यक्त केले.
मोजक्याच प्रेक्षकांच्या उपस्थितीत केबीपी महाविद्यालयात हा सोहळा नुकताच झाला. शेलार यांच्या हस्ते ज्येष्ठ बालनाट्य व्यवस्थापक नरेंद्र आंगणे यांना ‘गंधार गौरव पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी महापौर नरेश म्हस्के, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, प्रा. प्रदीप ढवळ, सचिन मोरे आदी मान्यवर तसेच सिनेनाट्य क्षेत्रातील नामवंत कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.
बालरंगभूमीला मुख्य प्रवाहात आणण्याची आज आवश्यकता आहे. कारण आजची बालरंगभूमीच उद्याची व्यावसायिक रंगभूमी आहे, असे प्रतिपादन म्हस्के यांनी केले.
बालप्रेक्षक निरागस आणि खरे असतात. त्यांना आवडले तरच ते दाद देतात अन्यथा गप्प बसतात. त्यामुळे बालनाट्य करणे ही सगळ्यात कठीण गोष्ट असल्याचे मत प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केले. व्यावसायिक नाटकाचा जेवढा खर्च असतो तेवढाच खर्च बालनाट्यालासुद्धा होतो. त्यामुळे बालनाट्यालासुद्धा शासनाने अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. केळकर
यांनी केली.
कोरोना योद्धांचा गौरव
या सोहळ्यामध्ये डाॅ. रूपाली काकुळते, डाॅ. रमेश अय्यर, डाॅ. पराग देशपांडे, डाॅ. मयूर महाजन, डाॅ. प्राची नारखेडे या डाॅक्टरांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव, जयवंत वाडकर, समीर चौगुले, विजय गोखले, अशोक समेळ आणि काही बालकलाकारांनी या सोहळ्यास ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. मृगा पटवर्धन हिने ईशस्तवन तर निवेदन ‘गंधार’चे प्रमुख प्रा. मंदार टिल्लू यांनी केले.