मुलांची आवड त्यांच्या लेखनाद्वारे ठरवावी

By Admin | Updated: February 6, 2017 04:15 IST2017-02-06T04:15:26+5:302017-02-06T04:15:26+5:30

मुलांना जे वाचायला आवडते, ते तर मुलांना द्यावेच. मात्र, मुलांना काय आवडले पाहिजे, याचाही विचार करून बालसाहित्याचे लेखन व्हायला हवे.

Children's interest should be decided by their writings | मुलांची आवड त्यांच्या लेखनाद्वारे ठरवावी

मुलांची आवड त्यांच्या लेखनाद्वारे ठरवावी

मुरलीधर भवार, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)
मुलांना जे वाचायला आवडते, ते तर मुलांना द्यावेच. मात्र, मुलांना काय आवडले पाहिजे, याचाही विचार करून बालसाहित्याचे लेखन व्हायला हवे. आजच्या बालसाहित्याने चांगली आणि हुशार मुले निर्माण केली, तर ‘बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले’ हा प्रश्न उपस्थित होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ बालकुमार साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांनी येथे केले.
साहित्य संमेलनातील ‘बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले?’ हा परिसंवाद शं.ना. नवरे सभामंडपात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ. जोशी अध्यक्षस्थानी होते. जोशी म्हणाले की, बालसाहित्याचा केंद्रबिंदू मुले आहेत. त्याच्या त्रिज्या आणि व्यास हे लेखक आहेत. मुलांचे साहित्य म्हणजे बडबडगीते, अशी अनेकांची धारणा आहे. बडबडगीते म्हणजे बालसाहित्य नाही. ही समजूत बालसाहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांनी मनातून काढून टाकावी. तरच, वस्तुनिष्ठ बालसाहित्य लेखन केले जाऊ शकते. मुलांची कल्पनाशक्ती विलक्षण असते. तिला वळण लावण्याचे काम बालसाहित्यिकांनी केले पाहिजे. याकडे जोशी यांनी लक्ष वेधले.
बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी सांगितले की, बालसाहित्य आणि बालशिक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बालसाहित्य हे बालकांच्या भवितव्याशी निगडित बाब असल्याने त्यावर गंभीर स्वरूपात चर्चा व्हायला हवी. ती होताना दिसून येत नाही. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे. बालसाहित्यातून मुलांचे आत्मभाव व भाव जागा होतो. बालसाहित्य हे उपेक्षित आहे. त्याला महत्त्वाचा प्रवाह मानले जात नाही. बोबडे बोल लिहिणे म्हणजे बालकविता होत नाही. मुलांना हल्ली संगणकाचा आणि टीव्हीचा पडदा आवडतो. त्यांच्या चुकीच्या प्रवृत्ती उफाळून येतील. त्यांच्या बालमनाची भूक भागवणारे बालसाहित्य लिहिले पाहिजे.
बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड म्हणाले की, मुलांचे साहित्य अनुकरणाच्या जंजाळात अडकून पडले, तर मुलांचे जग आणि भाषा समजून घेण्यास आपण कमी पडू. बालसाहित्य पाहिजे त्या प्रमाणात गुणात्मकदृष्ट्या वाढीस लागलेले नसून, ते संख्यात्मकदृष्ट्या वाढील लागले आहे. ते गुणात्मकदृष्ट्या वाढीला लागले पाहिजे. बालसाहित्याला एक प्रकारचे साचलेपण आले आहे. ते दूर झाले, तर बालसाहित्याला चांगले दिवस येतील.
बालसाहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी सांगितले की, पालकांनी मुलांना चांगल्या बालमासिकांच्या वाचनाची सवय लावली पाहिजे. ही जबाबदारी एकट्या लेखकाची नाही. मनोरंजन व प्रबोधनासह बालसाहित्याने ज्ञानार्जनाचेही काम केले पाहिजे. बालसाहित्याला वाचनाश्रय, राजाश्रय आणि समीक्षाश्रय मिळत नाही. तो मिळाला तर बालसाहित्याला नक्कीच चांगले दिवस येतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरेश साने यांनी केले.

Web Title: Children's interest should be decided by their writings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.