मुख्यमंत्री जिंकले, पालकमंत्र्यांनी फसवले
By Admin | Updated: September 8, 2015 23:33 IST2015-09-08T23:33:23+5:302015-09-08T23:33:23+5:30
त्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना राज्यशासनाने सोमवारी काढली. त्यामुळे त्या गावांच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या संघर्ष समितीने मंगळवारी डोंबिवली

मुख्यमंत्री जिंकले, पालकमंत्र्यांनी फसवले
- अनिकेत घमंडी, डोंबिवली
त्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना राज्यशासनाने सोमवारी काढली. त्यामुळे त्या गावांच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या संघर्ष समितीने मंगळवारी डोंबिवली तसेच कल्याण ग्रामीणमध्ये दिवाळी साजरी केली. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. तर पालकमंत्र्यांनी सपशेल फसवल्याची उघड टीकाही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच आगामी काळात जेव्हा निवडणुका होतील तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते नाही आले तरी, सर्व पक्षांची मिळून संघर्ष समिती उमेदवार उभे करणार असल्याचेही सांगण्यात आले. समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी यासंदर्भात ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
शिंदे यांनी वेळ मारून नेली...
१ जून रोजी या गावांना केडीएमसीत घेण्याचा निर्णय झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिशाभूल व चुकीची माहिती दिल्याने तो घेण्यात आला होता. त्यानंतर संघर्ष समितीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पालकमंत्र्यांसमवेत दोन वेळा बैठक झाली होती. परंतु, एकनाथ शिंदे यांनी त्या दोन्ही बैठकींदरम्यान बघतो... करतो... असे सांगून वेळ मारुन नेली.
त्यामुळे तर समस्या वाढली
प्रत्यक्षात पालकमंत्री मुख्यमंत्र्यांशी बालेलेच नाहीत. त्यामुळे समस्या वाढली, त्यानंतर कल्याणचे आमदार नरेंद्र पवार ज्यांचा या परिसराशी संबंधही नाही, त्यांनी सर्व व्यथा, म्हणणे ऐकून घेतले. नंतर तेच मुख्यमंत्र्यांशी बोलले.
एवढेच नव्हे तर त्यांनी ३० जुलै रोजी बैठकही लावली होती. त्यात सर्व सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही २७ गावे मनपात समावेश करण्यावचा निर्णय घाईत घेतला असून त्यात सुुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसारच हा निर्णय झाल्याचे गुलाब वझे म्हणाले.
त्या बैठकीला संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, चंद्रकात पाटील, अर्जून बुवा चौधरी, बळीराम चरे, उपाध्यक्ष, गणेश म्हात्रे, विजय भाने , तुळशीराम म्हात्रे, रमाकांत पाटील हे सेक्रेटरी, भगवान पाटील - खजिनदार, रंगनाथ ठाकुर, पांडुशील म्हात्रे, जालींदर पाटील, दत्ता वाझे, वासुदेव गायकवाड, रतन पाटील उपस्थित होते.
उपमहापौर खासदारांच्या भेटीला
स्थानिक भाजपाश्रेष्ठींवर नाराज असलेले शहराचे उपमहापौर राहुल दामले यांनी मंगळवारी संध्याकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. २७ गावांच्या विषयावरून स्थानिक भाजपा नेत्यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या चपराकच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यात कोणतेही राजकारण नसून कॅप्टन विनयकुमार सच्चान स्थारकासाठी खासदार निधीस मिळण्यास विलंब होत असल्याने त्याच्या पाठपुराव्यासाठी आपण भेट घेतल्याचे दामलेंनी स्पष्ट केले.