‘संमेलनासाठी प्रायोजकांकडे पैसा कुठून येतो ते तपासा’
By Admin | Updated: December 28, 2016 04:01 IST2016-12-28T04:01:16+5:302016-12-28T04:01:16+5:30
गेल्या साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणावर खिरापती वाटल्या गेल्या, त्या गैर होत्या असे सांगत या साहित्य संमेलनांचे प्रायोजकत्व स्वीकारणाऱ्यांकडे पैसा कुठून येतो हे पाहणे

‘संमेलनासाठी प्रायोजकांकडे पैसा कुठून येतो ते तपासा’
बदलापूर : गेल्या साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणावर खिरापती वाटल्या गेल्या, त्या गैर होत्या असे सांगत या साहित्य संमेलनांचे प्रायोजकत्व स्वीकारणाऱ्यांकडे पैसा कुठून येतो हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे मत लेखक विनय हर्डीकर यांनी मांडले. विचारयात्रा साहित्य संमेलनाच्या समारोप परिसंवादात ते बोलत होते.
सध्या साहित्य संमेलनासाठी जो डामाडौल केला जातो तो नक्की कशासाठी असाही प्रश्न हर्डीकर यांनी विचारला. ‘साहित्य संमेलनाने नेमके काय साधते’ या परिसंवादात ते अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी संमेलनातून नेमके काय साध्य व्हावे यावरही परखड मत मांडले.
साहित्य संमेलनात नव्या साहित्याचे वाचन, सादरीकरण व्हावे, वाचकांचा सहभाग वाढावा अशा संकल्पना त्यांनी यावेळी मांडल्या. राज्याच्या भाषा संचालिका मंजूषा कुलकर्णी यांनी संमेलनातील राजकारण आणि राजकारण्यांच्या सहभागावर आक्षेप घेतला. तसेच संमेलनाच्या विकेंद्रीकरणाची गरजही व्यक्त केली. तर मिलिंद जोशी यांनी साहित्य संमेलनात विचार कलह व्हावा, वाद नको अशी भूमिका मांडली. साहित्यिकाला सेलिब्रिटी म्हणून सादर करणे आवश्यक आहे. चित्रपटवाले कथा लेखकाला बोलवत नाही, राजकारणी सभेला साहित्यिकाला बोलवत नाही, मग आपण राजकारण्यांना का बोलवतो असा सवालही जोेशी यांनी केला. (प्रतिनिधी)
संस्कृतचे ओझे झुगारा
साहित्य महामंडळाने स्वत:मध्ये बदल करत अनेक ओझे फेकून देण्याची गरज आहे, असे हर्डिकर म्हणाले.
मराठीवर संस्कृतचेही ओझे आहे. ते झुगारून द्या. दुसऱ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटींना बोलावून काय साध्य होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.