दिवसाला बारावीचा एकच पेपर तपासणार
By Admin | Updated: February 19, 2016 02:27 IST2016-02-19T02:27:13+5:302016-02-19T02:27:13+5:30
बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

दिवसाला बारावीचा एकच पेपर तपासणार
ठाणे : बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन दिवसाला एकच पेपर तपासण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्ह्यातील दोन हजार शिक्षकांनी हा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये आॅनलाइन संचमान्यता त्रुटी दूर कराव्यात, आयटी शिक्षकांना वेतन मिळावे, ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत कराव्यात, पायाभूत पदांच्या वेतनाचा प्रश्न अशा विविध प्रकारच्या २५ मागण्या असून त्या १५ आॅगस्ट २०१५ पूर्वी मान्य करून संघटनेचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, अद्याप त्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. शासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रेय चितळे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)