डोंबिवली : प्रियकराकडून फसवणूक झाल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या २७ वर्षांच्या तरुणीस तिच्या प्रियकराने मारहाण केली. तसेच तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर, तिला पाच दिवस एका खोलीत डांबून ठेवले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे शांतनू फार्णे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंंध प्रस्थापित केले होते. परंतु, शांतनू अन्य एका तरुणीशी प्रेम करत असल्याची माहिती तिला मिळाली. त्यामुळे ती शांतनू याला जाब विचारण्यास गेली, तेव्हा शांतनूने त्याच्या करण नावाच्या मित्राला बोलावून घेत तिला जबर मारहाण केली. तसेच शांतनू व करण यांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर, शांतनू व करण यांनी त्यांच्या मैत्रिणींना बोलावले.अंजली, रीया आणि गौरी या तेथे आल्या. शांतनू व करण यांनी त्या तिघींना सांगितले की, आरडाओरडा करणारी तरुणी ही आमची बदनामी करत आहे. हे ऐकून त्या तिघींनी तिला मारहाण केली. या सगळ्या आरोपींनी तरुणीला पाच दिवस एका खोलीत डांबून ठेवले. पोलिसांनी शांतनू, करण, गौरी, रीया, अंजली यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अटक झालेली नाही. घडल्या प्रकाराविषयी वाच्यता केल्यास तुझ्या लहान बहिणीस पळवून नेऊ, अशी धमकी दिली. तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
फसवणूक करून प्रेयसीला मारहाण, पाच दिवस ठेवले डांबून, आरोपी मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 02:23 IST