स्वस्तात मोबाइल देतो सांगून तरुणीला फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:42 IST2021-09-18T04:42:37+5:302021-09-18T04:42:37+5:30

मीरा रोड : आपण मोबाइल कंपनीत कामाला असून स्वस्तात मोबाइल देतो, असे सांगून एका तरुणीच्या नावाने हप्त्याने तो खरेदी ...

Cheated on the young woman by saying he gives cheap mobiles | स्वस्तात मोबाइल देतो सांगून तरुणीला फसवले

स्वस्तात मोबाइल देतो सांगून तरुणीला फसवले

मीरा रोड : आपण मोबाइल कंपनीत कामाला असून स्वस्तात मोबाइल देतो, असे सांगून एका तरुणीच्या नावाने हप्त्याने तो खरेदी करण्यासह तिच्याकडून पैसे उकळणाऱ्या भामट्याविरुद्ध भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिर्डीनगरमध्ये राहणाऱ्या गायत्री रावत हिची मैत्रीण अंजली शाहू हिने चिराग पटेल (रा. रामनगर, शिर्डीनगर, भाईंदर पूर्व) याच्याशी ओळख करून दिली होती. मोबाइल कंपनीत कामाला असून महागातले फोन स्वस्तात मिळवून देईन, असे चिरागने सांगितल्यावर गायत्रीने वन प्लस मोबाइलबाबत विचारले. ७० हजारांचा मोबाइल २० हजारांत मिळेल व बाकीचे पैसे कंपनी भरेल, असे त्याने सांगितले. त्यानंतर तिने त्याला ११ हजार रोख दिल्यावर जो मासिक हफ्ता येईल त्यातील आर्धी रक्कम ही कंपनी भरणार, असे त्याने सांगितले.

गायत्रीने रोख रकमेसह तिचे आधारकार्ड, पॅनकार्ड व आईच्या नावे असलेले बजाज फायनान्सचे कार्ड चिरागला दिले. त्यानंतर ती मोबाइलबाबत विचारणा करू लागली असता कारणे सांगून तो टाळाटाळ करू लागला. तिने अंजलीला विचारले असता चिरागने माझ्यासह बऱ्याच जणांना फसवल्याचे तिने सांगितले. चिरागने गायत्रीच्या नावे वन प्लसऐवजी महागडा आयफोन हा मासिक हफ्त्यावर घेतल्याचे समजले. तिच्या खात्यातून मोबाइलचा मासिक नऊ हजार ५०० रुपयांचा हप्तासुद्धा कापला गेला.

मोबाइल मिळाला नाही, दिलेले पैसे मिळाले नाहीत वर बँकेतून हप्ता कापला जाऊ लागल्याने गुरुवारी गायत्रीने नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी चिराग पटेलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Cheated on the young woman by saying he gives cheap mobiles