मेणाच्या घरातील चिऊताईला अखेर मिळाले हक्काचे घर

By Admin | Updated: March 14, 2017 01:37 IST2017-03-14T01:37:38+5:302017-03-14T01:37:38+5:30

वाढती वृक्षतोड, वाढते नागरीकरण, औद्योगिकरण, प्रदूषण, मोबाइल टॉवर यामुळे चिमण्यांचे प्रमाण ५० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. घरातील आरश्यासमोर, इमारतीतील

Chaytai's house in the wax house finally got home | मेणाच्या घरातील चिऊताईला अखेर मिळाले हक्काचे घर

मेणाच्या घरातील चिऊताईला अखेर मिळाले हक्काचे घर

जान्हवी मोर्ये , डोंबिवली
वाढती वृक्षतोड, वाढते नागरीकरण, औद्योगिकरण, प्रदूषण, मोबाइल टॉवर यामुळे चिमण्यांचे प्रमाण ५० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. घरातील आरश्यासमोर, इमारतीतील अडगळ, जिने, गॅलरी, दुकानांच्या शटरवर घरटे करून राहणाऱ्या चिऊताईचा चिवचिवाट बंद झाला. चिऊताई यापुढे नवीन पिढीला पुस्तकातून आणि चित्र रूपाने सांगण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. हेच गृहीत धरून डोंबिवलीतील क्रीडासंकुलातील एका कोपऱ्यात ‘तिच्या’साठी हक्काचे चिऊ पार्क साकारले जात आहे.
‘रोटरी क्लब आॅफ डोंबिवली पश्चिम’ हे पार्क उभारत आहे. पक्षप्रेमी व रोटरीचे माजी अध्यक्ष राजीव मोहिते यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मोहिते दीड वर्षापासून हे पार्क उभारण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, त्यांना जागा मिळत नव्हती. महापालिकेने त्यांना क्रीडासंकुलातील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाशेजारील उद्यानातील जागा देऊ केली. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. चिऊ पार्कच्या कामाचा प्रारंभ ३० जून २०१६ ला महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तत्कालीन सभागृह नेते राजेश मोरे यांच्या उपस्थित झाला. चिमणी पार्क आता हळूहळू आकार घेत आहे. त्याच्या उभारणीवर आतापर्यंत १० लाखांचा खर्च झाला आहे. हे पार्क पूर्ण होण्यासाठी किमान ६० लाखांचा आणखी खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी मोहिते यांना मदतीची अपेक्षा आहे.
मोहिते हे अध्यक्ष असताना त्यांनी चिमण्यांसाठी घरटी जमवण्यास सुरुवात केली. पक्षीप्रेमी दीपक काळे यांनी त्यांना चिमणी वाचवाचा उपक्रम हाती घेण्याची सूचना केली. त्यानुसार ते कामाला लागले.
चिऊ पार्कमध्ये फॅब्रिक मेटालिक एमएस धातूपासून एक मोठा डोम तयार करण्यात आला आहे. त्यात २०० पेक्षा जास्त जातींची झाडे लावली जाणार आहेत. त्यावर चिमण्या घरटी बनवू शकतील. डोमला चौकोनी जाळीआहे. केवळ चिमणी आतमध्ये जाऊ शकेल इतक्याच आकाराचे हे चौकोन आहेत. त्यामुळे अन्य पक्षी चिमणीला त्रास देणार नाही. ते डोममध्ये जाऊन त्यांची अंडी खाऊ शकणार नाहीत, अशी काळजी डोम बनवताना घेण्यात आली आहे. पार्कमधील झाडांना लाकडी घरटी बांधली आहेत. खाद्यांसाठी फिडर तर पाण्यासाठी फिलर तयार केले आहेत. झाडांना येणाऱ्या फुलाचे कोंब, मध खाण्यात चिमण्यांना रस असतो. त्यामुळे डोममध्ये तशी झाडे लावली आहेत. झाडाच्या मुळापाशी अननसाचा चोथा त्यांना खाण्यासाठी टाकला जातो. ज्वारी, बाजरीच्या लोंब्याही तेथे उगवल्या जातील.
चिमणी पार्कमध्ये सनबर्ड, शिंपी, टेलरबर्ड या पक्षांबरोबर खारू ताईचा संसारही फुलला आहे. या पार्कमध्ये चिमण्यांचा मुक्त संचार आहे. त्यामुळे मुलांच्या सहली आल्या तरी त्यांना गटागटाने पार्कमध्ये सोडले जाईल. पण त्यांना घरट्यांजवळ जाता येणार नाही. त्याऐवजी दूरवरून दुर्बिणीने त्यांना चिमण्या पाहता येतील.

Web Title: Chaytai's house in the wax house finally got home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.