सेना, भाजपा काँग्रेसचेही राष्ट्रवादीसमोर आव्हान
By Admin | Updated: February 14, 2017 02:43 IST2017-02-14T02:43:24+5:302017-02-14T02:43:24+5:30
ठाणे महापालिका निवडणुकीत कळवा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. येथील काही प्रभागांचा विकास झाला असला

सेना, भाजपा काँग्रेसचेही राष्ट्रवादीसमोर आव्हान
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत कळवा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. येथील काही प्रभागांचा विकास झाला असला तरीदेखील काही प्रभाग हे आजही समस्यांनी ग्रासलेले आहेत. तसेच कळवा रुग्णालयदेखील याच भागात असल्याने विरोधकांना हे एक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचारासाठी मिळालेले आयते कोलीत आहे. त्यामुळे या लढतींकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. त्यात कळव्यात कुठेही अस्तित्व नसलेल्या भाजपाने येथील शिवसेनेच्या तीन उमेदवारांवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप केल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खाडी के उस पार, अशी काहीशी ओळख असलेल्या कळव्याचा मागील काही महिन्यांत कायापालट झाला आहे. रस्ता रुंदीकरणाबरोबर विविध विकासकामेदेखील या पट्ट्यात झालेली आहेत. शिवाय, याच एक भागात नवीन अत्याधुनिक भाजी मंडई, स्पोर्ट्स कॉम्लेक्सही येऊ घातले आहे. त्यामुळे कळव्याला आता या निवडणुकीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कळव्यात शिवसेनेच्या सध्या पाच जागा आहेत. तर, राष्ट्रवादीचे सुमारे आठ ते नऊ नगरसेवक आहेत. त्यामुळे आता नव्या प्रभागरचनेनुसार येथे राष्ट्रवादीला वाढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर, निष्ठावान शिवसैनिकांचा प्रभाग बदलण्यात आल्याने त्याच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे याचा फटका कदाचित प्रभाग क्रमांक २५ मध्ये शिवसेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, दुसरीकडे आता प्रभाग क्रमांक ९ मध्ये तब्बल २९ उमेदवार रिंगणात असून या ठिकाणी खरी लढत ही सुरेखा पाटील विरुद्ध अनिता गौरी यांच्यात होणार आहे. शिवाय, काँग्रेसनेदेखील येथे अ मधून आपला उमेदवार दिला आहे. तर, अ मधूनच गणेश कांबळे या शिवसेनेच्या उमेदवाराचा सामना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी आहे.
परंतु, भाजपाने कांबळे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी बाहेर काढल्याने त्याचे परिणाम आता येथे होणार आहेत. दुसरीकडे प्रभाग क्रमांक २३ मधून मुकुंद केणी यांची लढत अटीतटीची होणार असल्याचे चित्र आहे. त्यांची पत्नी प्रमिला केणी यादेखील याच प्रभागातून क मधून रिंगणात आहेत. केणी यांच्याविरोधात पुन्हा भाजपाचे अशोक भोईर हे उतरले आहेत.
भोईर यांचा मागील निवडणुकीत केणी यांनी पराभव केला होता. परंतु, आता भोईर यांची पुन्हा लढत केणी यांच्याशीच होणार असल्याने येथे बिग फाइट होणार, हे निश्चित मानले जाते. परंतु, केणी यांची पत्नी प्रमिला यांच्यासमोर फार कडवे आव्हान नाही.
त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या मोरे सुगंधा आणि भाजपाच्या दीपा गावंड या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघींचा चेहरा या प्रभागासाठी नवा असल्याने त्यांचा निभाव कितपत लागेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर, प्रभाग क्रमांक २४ मध्येदेखील मनीषा साळवी भाजपाच्या पुष्पाबाई भोडोकर आणि शिवसेनेच्या कुमारी प्रियंका पाटील यांच्याशी लढणार आहे. तर, त्यांचे पती महेश साळवी यांची लढत प्रभाग क्रमांक २५ मधून काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेशी होणार आहे. तर, प्रभाग क्रमांक २४ मध्ये राष्ट्रवादीच्या सुरेंद्र उपाध्याय यांचा सामना भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसबरोबर होणार आहे. तर, प्रभाग क्रमांक २५ मधून उपमहापौर राजेंद्र साप्ते यांची लढत ही भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कमकुवत उमेदवाराशी होणार आहे. (प्रतिनिधी)