भरगर्दीत तरुणीची चेन केली लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST2021-03-13T05:13:56+5:302021-03-13T05:13:56+5:30
भातसानगर : शहापुरात गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास देवीच्या मंदिराजवळ दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी एका तरुणीच्या गळ्यातील चेन चोरट्याने चोरून नेल्याचा ...

भरगर्दीत तरुणीची चेन केली लंपास
भातसानगर : शहापुरात गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास देवीच्या मंदिराजवळ दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी एका तरुणीच्या गळ्यातील चेन चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला.
दळखण येथील श्रद्धा सूर्यराव ही तरुणी काही कामानिमित्त शहापूर येथे आली होती. ती देवीच्या मंदिराजवळ भर रहदारीच्या रस्त्यावर आली असता तिच्या मागून आलेल्या एका तरुणाने तिच्या गळ्यात हात घालून तिची सोन्याची दीड तोळ्याची चेन काढून दुचाकीवरून पोबारा केला. ही तरुणी बरेच अंतर मागे धावली; परंतु चोरटा पळून गेला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासायला सुरुवात केली.
दरम्यान, याच परिसरात काही दिवसांपूर्वी वाफे येथील वंदना डिंगोरे या बचत गटाचे १४ हजार रुपये बँकेत भरण्यासाठी आल्या असता त्यांच्याजवळ असलेली पैशांची पिशवी फाडून चोरट्यांनी पैसे लंपास केले. अशा अनेक घटना या परिसरात घडल्या असून चोरटे मात्र पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी होत आहेत. तालुक्यात अशा घटना दररोज घडत असून अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुणी याबाबत पोलिसांत तक्रार करायला मात्र पुढे येत नसल्याची वस्तुस्थिती आहे.