सामाजिक वनीकरणातर्फे वनमहोत्सव साजरा
By Admin | Updated: August 15, 2014 01:38 IST2014-08-15T01:34:08+5:302014-08-15T01:38:06+5:30
सामाजिक वनीकरण विभाग, ठाणे व पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने बहाडोळी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

सामाजिक वनीकरणातर्फे वनमहोत्सव साजरा
मनोर : सामाजिक वनीकरण विभाग, ठाणे व पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने बहाडोळी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरात वृक्षदिंडी काढून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय हरित सेनेची शाळा नूतन विद्यालय, बहाडोळी येथे हा मेळावा झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
वृक्षांचे महत्व राखतानाच पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या बांधावर व वरकस जमिनीत वृक्षलागवड करण्याचे आवाहन सामाजिक वनीकरणाचे पालघरचे लागवड अधिकारी रूचिता संखे यांनी केले, तसेच पंचायत समितीचे सदस्य सचिन पिंपळे यांनी शेतकऱ्यांना वृक्षामुळे होणारे फायदे व त्यांचे महत्व पटवून दिले. बहाडोळीचा जांभूळ जगभरामध्ये प्रसिध्द आहे.
ज्याप्रमाणे प्रत्येक वर्ष बहाडोळीच्या शेतकऱ्यांना जांभळाचे उत्पन्न दिड ते दोन लाख रूपये मिळते अशाप्रकारे दुसऱ्या फळांचीही लागवड करून एक प्रकारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या कार्यक्रमाला मुकेश शहा, मुख्याध्यापक मनोहर पाटील, सरपंच सुजाता बरफ, उपसरपंच मिनाताई पाटील, प्रफुल्ल घरत शिक्षक, अशोक पाटील तंटामुक्त अध्यक्ष, प्रमोद सीगते आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये निसर्गाचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध ठिकाणी महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण, ठाणे व पालघर विभागातर्फे दिंडी काढून जनजागृती करीत आहे. यावेळी बहाडोळी येथील शाळकरी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ, महिलावर्गही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)