वाडा एसटी स्थानकात सीसी कॅमेरे
By Admin | Updated: April 1, 2017 05:12 IST2017-04-01T05:12:33+5:302017-04-01T05:12:33+5:30
वाडा येथील बस स्थानकाच्या परिसरात वावरणाऱ्या अपवृत्तीनां आवर घालण्याच्या उद्देशाने द्रोणा फाउंडेशनच्या पुढाकाराने

वाडा एसटी स्थानकात सीसी कॅमेरे
वाडा : येथील बस स्थानकाच्या परिसरात वावरणाऱ्या अपवृत्तीनां आवर घालण्याच्या उद्देशाने द्रोणा फाउंडेशनच्या पुढाकाराने तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात घडणाऱ्या गैरकृत्यांनाही आळा बसणार असल्याचे द्रोणा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नितीन मोकाशी यांनी सांगितले.
वाडा बस स्थानक अपूर्ण पडत असल्याने हे स्थानक दोन वेळा नवीन बस स्थानका मध्ये नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, स्थानिक प्रवाशांची गैरसोय होत असल्याने हे स्थानक पुन्हा जैसे थे ठेवण्यात आले.
या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस वाहतूक कोंडी होऊन प्रवासी व इतर वाहनांना सुद्धा त्रास होत होता. तर शाळा, कॉलेज सुटल्यानंतर रोड रोमियोंचा त्रास महिला व मुलींना होत असल्याचे निदर्शनास आल्याने द्रोणा फाउंडेशनने पुढाकार घेऊन स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे, मॉनिटर व इतर सामग्री उपलब्ध करून दिली आहे.
या बाबत आगार व्यवस्थापकांशी संपर्क केला असता गर्दीच्या प्रसंगी पाकीटमार, चोर व अन्य प्रवृत्तीच्या घटकांकडून होणाऱ्या त्रासाला पायबंद घालण्यासाठी तसेच प्रवाशी व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे ही बाब महत्वाची असल्याने द्रोणा फाउंडेशनच्या मदतीने सध्या तीन कॅमेरे बसवले असून दोन दिवसात ही प्रणाली सुरु करण्यात येईल असे आगार व्यवस्थापक मधुकर धांगडा यांनी सांगितले. बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांनी राज्य परिवहनच्या वाडा आगार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
(वार्ताहर)