भाजपा नगरसेविकेचे जातप्रमाणपत्र रद्द

By Admin | Updated: December 22, 2016 05:49 IST2016-12-22T05:49:34+5:302016-12-22T05:49:34+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग क्र.-४अ च्या भाजपा नगरसेविका सरस्वती रजनीकांत मयेकर यांचे जातप्रमाणपत्र खोटे

Caste certificate of BJP corporation canceled | भाजपा नगरसेविकेचे जातप्रमाणपत्र रद्द

भाजपा नगरसेविकेचे जातप्रमाणपत्र रद्द

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग क्र.-४अ च्या भाजपा नगरसेविका सरस्वती रजनीकांत मयेकर यांचे जातप्रमाणपत्र खोटे असल्याचा निर्णय जातपडताळणी समितीच्या फेरतपासणीत उघड झाल्याने उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे शाबूत राहिलेले नगरसेवकपद पुन्हा धोक्यात आले आहे.
आॅगस्ट २०१२ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर माजी नगरसेवक रजनीकांत मयेकर यांची पत्नी सरस्वती निवडून आल्या होत्या. महिलांच्या इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघातून निवडून आलेल्या मयेकर यांनी इतर मागासवर्गातील ‘मच्छीमार दालदी’ या जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी कोकण विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केले होते. त्यावेळी समितीने मयेकर यांचे जातप्रमाणपत्र वैध ठरवत त्यांना १२ जुलै २०१२ रोजी वैधता प्रमाणपत्र दिले. जातपडताळणीवेळी मयेकर यांनी वडिलांच्या शाळेचा दाखला सादर केला होता. त्यात त्यांची जात मुसलमान सुुन्नी अशी नमूद केली असतानाही समितीने त्यांना जातवैधता प्रमाणपत्र दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. मयेकर या मुस्लिम समाजाच्या असून लग्नापूर्वी त्यांचे नाव फरजाना अलिमिया शेगले, असे होते. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मच्छीमार दालदी या जातीनुसार मयेकर यांनी आपल्या वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय नमूद केला होता. समितीच्या निर्णयाविरोधात पराभूत उमेदवार व राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका नर्मदा वैती यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर, न्यायालयाने १४ मार्च २०१३ रोजी निर्णय देत सदर चौकशी कोकण विभागीय जातप्रमाणपत्र समितीपुढे सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, झालेल्या चौकशीत समितीला जातपडताळणीवेळी मयेकर यांनी १९६७ पूर्वी सादर केलेल्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्यात त्यांची जात मुसलमान सुन्नी नमूद केल्याचे आढळून आले. तेव्हा मयेकर यांनी उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी उल्लेख केलेली मच्छीमार दालदी ही इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जातीचा दावा खोटा असल्याचा निर्वाळा समितीने दिला. शिवाय, मयेकर यांचे वडील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. त्यामुळे त्यांनी वडिलांचा दाखवलेला मासेमारीचा व्यवसायही फोल ठरल्याने मयेकर यांना आपल्या जातीचा कोणताही पुरावा चौकशी समितीपुढे मांडता आला नाही. यावरून, समितीने ३० जुलै २०१३ रोजी दिलेल्या आदेशात सरस्वती मयेकर या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मच्छीमार दालदी या जातीच्या नसून त्यांनी जातीचा दिलेलादाखला खोटा असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, त्यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून ते जप्त करण्यात येत असल्याचेही आदेशात म्हटले होते. समितीच्या निर्णयानुसार पालिकेने आॅगस्ट २०१३ मध्ये मयेकर यांचे नगरसेवकपद रद्द केल्याची नोटीस बजावली. (प्रतिनिधी)

Web Title: Caste certificate of BJP corporation canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.