पालिकेचा परिवहन विभाग कॅशलेस
By Admin | Updated: February 6, 2017 04:10 IST2017-02-06T04:10:21+5:302017-02-06T04:10:21+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागाने ठाणे मार्गावरील सर्व सेवांसाठी प्रवाशांना मोबाइल तिकिटाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

पालिकेचा परिवहन विभाग कॅशलेस
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागाने ठाणे मार्गावरील सर्व सेवांसाठी प्रवाशांना मोबाइल तिकिटाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. परिवहनच्या कॅशलेस उपक्रमाला प्रवाशांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. या प्रायोगिक तत्त्वावरील कॅशलेस संकल्पना यशस्वी ठरल्यास ती इतर मार्गांवरही सुरू करण्यात येणार आहे.
डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया ही संकल्पना अमलात आणण्यासाठी परिवहन विभागाकडून काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. प्रवाशांना अनेकदा सुट्या पैशांअभावी वाहकासोबत वाद घालावा लागतो. बसमध्ये वाद होऊ नये, यासाठी विभागाने थेट मोबाइलद्वारेच तिकीट देण्याचा निर्णय घेतला.
यासाठी विभागाने ब्ल्यू बर्ड्स या खाजगी कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली. सुरुवातीला कंपनीकडून मोफत सेवा देण्याचे निश्चित करण्यात आले. कंपनीने तयार केलेल्या रिडलर या अॅपद्वारे प्रवाशांना कॅशलेस तिकिटे देण्याचे निश्चित केले. कॅशलेस तिकीट प्रणाली सुरू करण्यासाठी प्रवाशांना ते अॅप त्यांच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून घेण्यासाठी जनजागृती केली. हे अॅप सुरू होणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.
वॅलेटमध्ये प्रवाशांनी ठरावीक रक्कम भरल्यानंतर त्याचा बसच्या तिकिटासाठी वापर करता येणे शक्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विभागाने ती सेवा कारभारात आणण्याचे निश्चित केले. २५ टक्के उत्पन्न देणाऱ्या ठाणे मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर याची नुकतीच सुरुवात झाली.