कांदळवन क्षेत्रात भराव व बांधकामे करणाऱ्यांवर दोन वर्षांनी गुन्हे दाखल
By धीरज परब | Updated: April 19, 2025 14:16 IST2025-04-19T14:15:48+5:302025-04-19T14:16:12+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने २००५ साली आणि नंतर २०१८ साली कांदळवन व कांदळवनपासून ५० मीटरचा बफर झोन हा संरक्षित केला आहे.

कांदळवन क्षेत्रात भराव व बांधकामे करणाऱ्यांवर दोन वर्षांनी गुन्हे दाखल
मीरारोड- भाईंदर व मीरारोडच्या घोडबंदर भागात कांदळवन क्षेत्रात भराव व बांधकाम प्रकरणी महसूल विभागाने नवघर आणि काशीगाव पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे घोडबंदर प्रकरणी दोन वर्षांनी गुन्हा दाखल होत असून एका जागेत तर पालिकेच्या परवानगीने इमारत बांधकाम परवानगी दिली असताना पालिका अधिकारी यांना आरोपी केलेले नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने २००५ साली आणि नंतर २०१८ साली कांदळवन व कांदळवन पासून ५० मीटरचा बफर झोन हा संरक्षित केला आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा भराव, बांधकाम बंदी आहे. ह्या क्षेत्रात कोणतेही वनेत्तर काम व वापर करण्यास बंदी आहे. भराव, बांधकाम झाले असल्यास ते काढून पूर्वस्थिती निर्माण करणे नुसार कांदळवन लागवड व भरतीचे पाण्याचा मार्ग मोकळा करणे आवश्यक आहे. त्याचे पालन करण्याची जबाबदारी महापालिका, पोलीस, महसूल, वन विभागासह लोकप्रतिनिधी, राजकारणी यांची पण आहे.
सदर यंत्रणांच्या आशीर्वादाने राजरोस कांदळवन कत्तल करून त्यात भराव करून भूखंड तयार केले गेले आहेत. त्यात कच्ची - पक्की बांधकामे झालेली आहेत. इतकेच नव्हे तर महापालिकेने गुन्हे दाखल असलेल्या तसेच कांदळवन क्षेत्रात बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. त्याला वीज, पाणी आदी सर्व सुविधा दिल्या जात आहेत.
दरम्यान तक्रारी आल्या नंतर देखील तातडीने कारवाई होत नाही. अश्याच दोन प्रकरणात महसूल विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. मौजे घोडबंदर येथील सर्व्हे क्रं. १ / १ ते ७, सर्व्हे क्रं. ३ /१ ते ७, सर्व्हे क्रं. ५ / १ ते ५, सर्व्हे क्रं. ५५ / १ ते ४, सर्व्हे क्रं. ७ / १ ते ७, सर्व्हे क्रं. २३२ / १ व २ आणि सर्व्हे क्रं. ४३ / १ ते ६ ज्या जागेतील कांदळवन क्षेत्रात कांदळवन नष्ट करून डेब्रिज व मातीची भरणी टाकून भरतीच्या पाण्याचे मार्ग बंद केले गेले. त्यावर झोपड्या, गोदामे सह अन्य बांधकामे झाली. तक्रारी नंतर उपसमितीची मार्च २०२३ व जुलै २०२३ मध्ये ऐकून ३ वेळा स्थळपाहणी केली गेली होती.
जुलै २०२३ व जानेवारी २०२४ मध्ये कांदळवन वन परिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांचा २००५ नुसारचा एमआरसॅक नकाशाचा हवाला देऊन अहवाल दिला होता. त्याचा गुन्हा दोन वर्षांनी म्हणजेच १५ एप्रिल रोजी काशिगाव पोलीस ठाण्यात तलाठी ललित सातपुते यांनी दाखल केला आहे. सदर गुन्ह्यात केवळ अनोळखी नमूद केले असून सातबारा नोंदी नावे असलेल्या, भराव व सपाटीकरण करणारे वाहन चालक - मालक, जागेवरील भोगवटादार आदींना आरोपी न करता केवळ अनोळखी आरोपी नमूद केला आहे.
मिरारोड पूर्वेच्या कनकिया परिसरात कांदळवन क्षेत्र बाबतच्या तक्रारीनंतर १८ एप्रिल २०२४ रोजी स्थळपाहणी झाली होती. कांदळवन वन परिक्षेत्र अधिकारी यांनी डिसेम्बर २०२४ मध्ये अहवाल देत मौजे नवघर येथील सर्व्हे क्रं. ८४ हिस्सा क्रं. ४ ह्या कांदळवन ५० मीटर बफर झोन मध्ये पालिकेने बांधकाम परवानगी दिली. बांधकाम परवानगी नुसार खोदकाम करून इमारतीचे बांधकाम सुरु केले गेले. या प्रकरणी तलाठी तुषार खेडकर यांच्या फिर्यादी वरून वालचंद अव्हेन्यू इमारतीचे विकासक हरीश प्रकाश जैन विरोधात पर्यावरण संरक्षण कायदा नुसार मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु बांधकाम परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकारी यांना आरोपी केलेले नाही.