मांजर मारल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:20 IST2019-01-17T01:19:48+5:302019-01-17T01:20:01+5:30
ठाण्यातील वृंदावन या उच्चभ्रू सोसायटीमध्ये मांजराला अज्ञात व्यक्तीने मारल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

मांजर मारल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा
ठाणे : ठाण्यातील वृंदावन या उच्चभ्रू सोसायटीमध्ये मांजराला अज्ञात व्यक्तीने मारल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जमिनीत पुरलेले मांजरीचे शव काढून मारहाणीचे अवलोकन करण्यासाठी ते भिवंडी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
वृंदावन सोसायटीमधील नीलेश मालवीय हे परेल येथील एका नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांची पत्नी पूनम या प्राणिप्रेमी असून त्या भटक्या प्राण्यांची काळजी घेतात. त्यांची मोठी मुलगी जिया (१४) हिला ते वास्तव्यास असलेल्या इमारत क्रमांक-८४ मधील ‘बी’ विंगच्या आवारामध्ये एक बेवारस मांजर आढळली. त्यांनी काळजीपोटी तिला घरी आणले. १४ जानेवारी २०१९ रोजी सकाळी या मांजरीने तीन गोंडस पिलांना जन्म दिला. त्यानंतर, या मांजरीला कोणीतरी लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये सापडली. इमारतीच्या आवारामध्ये या कुटुंबाने तिचा दफनविधीही केला. या प्रकरणाची माहिती मिळताच आणखी एक प्राणिप्रेमी राहुल कुडतरकर यांनी मालवीय कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या आग्रहाने नीलेश मालवीय यांनी याप्रकरणी कलम ४२९ अन्वये राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
कायद्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे मांजरीची हत्या झाल्याची माहिती होऊनही शवविच्छेदनापूर्वीच तिला मालवीय कुटुंबाने पुरल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून, मारेकऱ्याचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले.
याआधीही मांजरीची हत्या
ठाण्यातील कासारवडवली भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सोळाव्या मजल्यावरून विदेशी जातीच्या मांजरीला एका रहिवाशाने फेकल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना तीन आठवड्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी मारेकºयाला कासारवडवली पोलिसांनी अटक केली होती.