नोटबंदी नव्या पर्वाची सुरुवात
By Admin | Updated: November 14, 2016 04:15 IST2016-11-14T04:15:57+5:302016-11-14T04:15:57+5:30
देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या २५ टक्के काळी अर्थव्यवस्था आहे. एकूण नोटांपैकी १५ टक्के नोटा खोट्या आहेत. काळी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली

नोटबंदी नव्या पर्वाची सुरुवात
ठाणे : देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या २५ टक्के काळी अर्थव्यवस्था आहे. एकूण नोटांपैकी १५ टक्के नोटा खोट्या आहेत. काळी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि खोट्या नोटा हद्दपार झाल्यावर येत्या काळात लोकांनी मोठ्या नोटांचा वापर टाळून ई-व्यवहार वाढवावे. परिणामी, व्यवहार अधिकाधिक सुसह्य आणि पारदर्शी होतील, हाच नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामागील हेतू आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांनी केले.
सध्या सुट्या पैशांची चणचण जाणवत असली तरी लोकांनी आपले पैसे धोक्यात आहेत, असे समजू नये. गोंधळून जाऊ नये. ही नव्या पर्वाची सुरुवात आहे, असेही ते म्हणाले.
‘विचार व्यासपीठ’च्या वतीने ‘आर्थिक सर्जिकल स्ट्राइक’ या विषयावर सहयोग मंदिर सभागृहात डॉ. फडणीस यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले की, ५०० आणि हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय झाल्यावर गेल्या चार दिवसांत सर्वाधिक फरफट सर्वसामान्य माणसांची झाली आहे. सर्वसामान्य माणसांच्या आणि बँक कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेला नमस्कार करावा लागेल. परंतु, त्रासाचा हा टप्पा थोड्या दिवसांचा आहे.
या काळात आपण सर्व व्यवहार रोखीने करण्याची गरज नाही. आपल्या घरात रोख रक्कम असावी, ही सर्वसामान्य माणसाची मानसिकता योग्य नाही. अधिकाधिक लोकांनी ई-व्यवहार करावे. ज्येष्ठाांनीही तरुणांकडून मोबाइल, कॉम्प्युटरच्या माध्यमातून घरबसल्या कसे व्यवहार करायचे, हे शिकून घ्यावे. अर्थसाक्षरता वाढवण्याची गरज आहे, असेही फडणीस म्हणाले. कष्टाचे पैसे असलेल्यांनी चढ्या दराने सोने विकत घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
सध्या आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल दमदार आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक लोक कर भरतील. त्यामुळे कराचे दरही कमी होतील. काळ्या पैशांमुळे वस्तूचे वाढलेले दर कमी होऊन स्वस्ताई येईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. या वेळी व्यासपीठावर संजीव ब्रह्मे, मकरंद मुळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)