शहर अध्यक्षांच्या प्रभागात उपऱ्यांना उमेदवारी

By Admin | Updated: February 8, 2017 04:07 IST2017-02-08T04:07:11+5:302017-02-08T04:07:11+5:30

ठाणे शहर भाजपचे अध्यक्ष संदीप लेले यांच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये पक्षाला सक्षम उमेदवार न मिळाल्यामुळे चारही तिकीटे इतर पक्षांतून आलेल्या उमेदवारांना

The candidates for the post of Chairman of the City President | शहर अध्यक्षांच्या प्रभागात उपऱ्यांना उमेदवारी

शहर अध्यक्षांच्या प्रभागात उपऱ्यांना उमेदवारी

जितेंद्र कालेकर , ठाणे
ठाणे शहर भाजपचे अध्यक्ष संदीप लेले यांच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये पक्षाला सक्षम उमेदवार न मिळाल्यामुळे चारही तिकीटे इतर पक्षांतून आलेल्या उमेदवारांना पक्षाने बहाल केली आहेत. अशीच परिस्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादीचीही असल्यामुळे या प्रभागामध्ये सर्वच पक्षांची भिस्त आयारांमांवर अवलंबून आहे.
माजी नगरसेवक लेले पूर्वी तीन वर्ष आणि आता वर्षभरापासून शहर अध्यक्ष आहेत. मात्र, भाजपचा एकही जुना कार्यकर्ता उमेदवार म्हणून त्यांच्याच प्रभागात मिळू शकलेला नाही. प्रभाग २० - अ मधून सुबोध ठाणेकर या तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपामध्ये दाखल झालेल्याला उमेदवारी दिली आहे. तर २० - ब मधून दिवंगत कट्टर शिवसैनिक भालचंद्र पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी शिवसेनेतून त्यांना आयात केले होते. २०- क मध्येही राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणि शिवसेनेतून एकाच रात्रीत भाजपात प्रवेश केलेले नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांची मुलगी किरण हिला तिकीट दिले आहे. केवळ स्वार्थासाठी एकाच रात्रीत तीन पक्ष बदलणाऱ्या टिकमानींऐवजी भाजपात एकही जुना कार्यकर्ता नेत्यांना मिळाला नाही का? अशी टीकाही आता पक्षातूनच होत आहे. २०- ड मध्येही राष्ट्रवादीतून काही महिन्यांपूर्वीच पक्षात दाखल झालेले राष्ट्रवादीचे नगरसेवक भरत चव्हाण यांना उमेदवारीची बक्षिसी मिळाली आहे. येथेही भाजपला एकही पक्षाचा कार्यकर्ता न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
काँग्रेसही आयारामांच्या भरवशावर
काँग्रेसचीही याठिकाणी वेगळी परिस्थिती नाही. काँग्रेसच्या वाट्याला २० - ब आणि ड हे दोन प्रभाग आले आहेत. त्यातील ब मध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या एक दिवस आधी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आदिती अजित सावंत यांना तिकीट मिळाले आहे. तर ड - मध्ये डॉ. असिन शाह यांनी पक्षाचे प्राथमिक सभासद नसतांनाही त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळविली आहे. विशेष म्हणजे ब आणि ड साठी अनेक जुने कार्यकर्ते काँग्रेसमध्येही इच्छुक होते. त्यांना डावलून काँग्रेसनेही सेना भाजपपेक्षा आम्हीही काही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.
मनसेतही निष्ठावंतांची वानवा...
शिवसेनेच्या मदतीने प्रभाग समिती अध्यक्षपद पदरात पाडून घेणाऱ्या नगरसेविका राजश्री नाईक यांच्यावर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी निलंबनाची कारवाई केली होती. परंतु, आता त्या पुन्हा पक्षात आल्यामुळे त्यांना २०- क मधून पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे.
शाखाप्रमुख रवींद्र मोरे यांना आता मनसेने २० - ड मधून एबी फॉर्म दिला आहे. त्यानंतर मनसेत आल्यामुळे त्यांना शहरप्रमुख पद मिळाले. पण पक्षात मन न लागल्यामुळे ते पुन्हा शिवसेनेत गेले. पण त्यावेळी त्यांनी उपशहरप्रमुख पदही पदरात पाडून घेतले. अर्थात, पुन्हा शिवसेनेतून मनसेत उडी घेऊन त्यांनी आता उमेदवारी मिळविली आहे. त्यामुळे कधी सेना कधी मनसे करणाऱ्या मोरेंनाही मनसेने उमेदवारी दिल्याने तिथेही हा चर्चेचा विषय झाला आहे.

Web Title: The candidates for the post of Chairman of the City President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.