campaign to give Bharat Ratna to Sharad Pawar | शरद पवार यांना भारतरत्न देण्यासाठी ठाण्यात सह्यांची मोहीम
शरद पवार यांना भारतरत्न देण्यासाठी ठाण्यात सह्यांची मोहीम

ठाणे - शरद पवार यांना ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ठाणे रेल्वे स्थानक येथे सह्यांची मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे ठाणे अध्यक्ष कैलास हावळे यांनी ही मोहीम राबविली. ठाणे रेल्वे स्थानक येथे फलटा क्रमांक एकच्या बाहेर ही मोहीम राबविली.

विशेष म्हणजे, ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांना गाठून स्वाक्षरी करीत शरद पवार यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी केली. तीन तासांच्या या स्वाक्षरी मोहीमेमध्ये सुमारे 9 हजार 720 नागरिकांनी सहभाग घेत  स्वाक्षरी करून शरद पवारांना भारतरत्न देण्याबद्दल अनुकूलता दर्शवली. यावेळी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, “शरद पवार यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्यात यावे, अशी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शरद पवार हे गेली 52 वर्षे महाराष्ट्र आणि देशाच्या उत्कर्षासाठी झगडत आहेत.

सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना त्यांनी देशातील अनेक संविधानिक पदे भूषविली असून त्यांच्यामुळेच या पदांचा सन्मानही वाढला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी महाराष्ट्राला विकसीत राज्यांच्या रांगेत बसवले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण त्यांच्याच योगदानामुळे झाली आहे. संरक्षण मंत्रीपदाच्या काळात त्यांनी भारताच्या सीमारेषांवरील घुसखोरी आटोक्यात तर आणलीच होती. शिवाय, सियाचीनसारख्या सर्वात उंच युद्धभूमीला भेट देऊन त्यांनी भारतीय सैन्याने मनोबल वाढविले होते. भारताच्या सैन्यदलाला सक्षम करण्याची सुरुवात त्यांच्याच कार्यकाळात झाली होती. तर, कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याला सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणि उपक्रम त्यांनी राबविले. त्यांच्याच कार्यकाळात भारतातून अन्नधान्याची सर्वाधिक निर्यातही झाली होती. याशिवाय अनेक सामाजिक, क्रीडा, शिक्षण आदी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांचा ठसा जागतिक पातळीवर उमटला आहे. त्यामुळेच त्यांना ‘भारतरत्न‘ देऊन गौरविण्यात यावे.”

कैलास हावळे यांनी सांगितले की, शरद पवार हे चालते-बोलते विद्यापीठ आहे. केवळ राजकीयच नव्हे; तर कृषी, शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये काम करुन या क्षेत्रांना प्रगतिपथावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. किंबहुना, आयसीसीचे अध्यक्ष असताना त्यांच्यामुळे क्रिकेटसारख्या खेळाला उच्च प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांची जाण असलेला त्यांच्याइतका प्रगल्भ नेता सबंध देशामध्ये नाही. त्यामुळे या बहुआयामी नेत्याला भारतरत्नने सन्मानित करावे, अशी आमची मागणी आहे. हा उपक्रम शहराच्या विविध भागांमध्ये राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.   
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मुकूंद केणी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग, महाराष्ट्र प्रदेश सचिव ज्योती निंबर्गी, फुलबानो पटेल, पूनम वालिया, स्मिता पारकर, वंदना लांडगे, वंदना हुंडारे, शुभांगी कोळपकर, सिंधुताई रणदिवे, ज्योती चव्हाण, नलिनी सोनावणे, शेळके आदी उपस्थित होते.

Web Title: campaign to give Bharat Ratna to Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.