जिल्ह्यात गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम; पालघरमध्ये ६० हून अधिक किल्ल्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:30 IST2021-02-07T00:30:38+5:302021-02-07T00:30:46+5:30
किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत २००३ सालापासून पालघरमधील ऐतिहासिक गडकोट व पर्यटनस्थळे, मंदिरे, मूर्तीच्या संवर्धनासाठी श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून कार्य केले जाते.

जिल्ह्यात गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम; पालघरमध्ये ६० हून अधिक किल्ल्यांची दुरवस्था
पालघर : जिल्ह्यातील ६० हून अधिक गडकोटांपैकी प्राथमिक स्वरूपात १० गडकोटांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून त्याच्या संवर्धनासाठी ठोस कार्यक्रम आयोजित करावा, या मागणीसाठी गडकिल्ले वसई मोहीमचे श्रीदत्त राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अंदाज समितीप्रमुख रणजित कांबळे यांनी यासंदर्भात तात्काळ कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत २००३ सालापासून पालघरमधील ऐतिहासिक गडकोट व पर्यटनस्थळे, मंदिरे, मूर्तीच्या संवर्धनासाठी श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून कार्य केले जाते. मागील १८ वर्षांत दुर्गसंवर्धन, इतिहास मार्गदर्शन मोहीम, ऐतिहासिक व्याख्यानमाला, कडेकोट विजयदिन परंपरा, मोडी लिपी संवर्धन या माध्यमातून आजवर ३ हजार ५०० हून अधिक विनामूल्य उपक्रम मोहिमेअंतर्गत आयोजिले आहेत. सर्व उपक्रमाचा मुख्य हेतू जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-कोट स्थळांचे संवर्धन व्हावे, असा असल्याचे श्रीदत्त राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जिल्ह्यात गडकोट, बुरुज, दुर्गकिल्ले इ. ६० प्रकार उपलब्ध असून यातील माहीम, सफाळे, केळवे, बोईसर भागांत मोठ्या प्रमाणावर किल्ले आहेत. याची डागडुजी अनेक वर्षे झालेली नसून त्यावरील स्थळे, पाणवठे, तोफा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आम्ही किल्ले वसई मोहीमअंतर्गत दर रविवारी व सुटीच्या दिवशी स्वतः प्रत्यक्ष सहभागातून व स्थानिक दुर्गमित्रांच्या मदतीने श्रमदान मोहीमअंतर्गत सदर गडाचे संवर्धन केलेले आहे. पण आपल्या शासकीय यंत्रणा अंतर्गत त्या किल्ल्याचे अधिकृत नोंदणी करून आर्थिक मदतनिधी उपलब्ध करून दुर्ग संवर्धनात पाठबळ निर्माण करण्यासाठी श्रीदत्त राऊत, प्रसिद्ध आर्किटेक्ट निशांत पाटील, विनीत पाटील, अभिजित पाटील, प्रोत्साहन पाटील, प्रीतम पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांना निवेदन दिले होते.
या मागणीसंदर्भात अंदाज समितीचे प्रमुख आमदार कांबळे, आ. कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी गुरसळ यांची भेट घेत गडकिल्ल्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या श्रीदत्तसारख्या दुर्गप्रेमींना निधीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.