भारत बंदच्या आवाहनाला ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी लाभला चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 12:22 AM2020-12-09T00:22:31+5:302020-12-09T00:23:15+5:30

Bharat Bandh In Thane : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने दोन्ही शहरांत बंदची हाक देण्यात आली होती.

The call for Bharat Bandh received a good response in Thane district | भारत बंदच्या आवाहनाला ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी लाभला चांगला प्रतिसाद

भारत बंदच्या आवाहनाला ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी लाभला चांगला प्रतिसाद

Next

अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र काही रिक्षाचालकांनी संघटनेचा आदेश धुडकावत आपल्या रिक्षा सुरू ठेवल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने दोन्ही शहरांत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये शहरातील व्यापाऱ्यांनीही सहभाग नोंदविला तर रिक्षा संघटनेने बंदला समर्थन दर्शविले. मंगळवारी सकाळपासून सर्व दुकाने बंद राहिल्याने नागरिकांनीही घरी राहणे पसंत केले. मात्र कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांनी बंदची तमा न बाळगता आपले नियमित व्यवहार आणि प्रवास सुरू ठेवला. तर दुसरीकडे रिक्षा संघटनेने बंदची हाक देऊनही काही रिक्षाचालक बेधडकपणे भाडे आकारत होते. त्यामुळे संघटनेत संभ्रम निर्माण झाला होता.

बंदच्या निमित्ताने लोकशाही आघाडीच्या वतीने शहरात सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली होती. तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे बंद पुकारल्याने हा बंद यशस्वी झाला तर दुसरीकडे बंदला विरोध करत भाजपने शहरात काही ठिकाणी बॅनरबाजी करत ‘हमारा भारत बंद नही रहेगा’ आशयाचे फलक लावले होते. हे बॅनर पाहून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही त्याच बॅनरच्या बाजूला ‘भारत बंद’चा बॅनर लावत आपला संताप व्यक्त करण्यात आला. 

भिवंडीत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
भिवंडी : कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला भिवंडीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी मंगलबाजार, वंजारपट्टी नाका, जकात नाका, बस स्टॅण्ड, कोटर गेट अशा शहरातील मुख्य ठिकाणी बंद पाळण्यात आला. मात्र दुपारी एकनंतर सर्वत्र दुकाने उघडलेली पाहायला मिळाली. दुपारनंतर रिक्षांची वाहतूकही सुरू झाली. बंदमुळे रस्त्यांवर शुकशुकाट असेल अशी अपेक्षा होती. मात्र धामणकर नाका तसेच कल्याण नाका व जकातनाका परिसरात चक्क वाहतूककोंडी होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

शहापूरमध्ये १०० टक्के बंद
शहापूर : शहपूर तालुक्यात बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट होता. पंचायत समितीच्या शिवस्मारकाजवळ केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. किन्हवली, वासिंद, खर्डी, डोळखांब, शेणवा, आसनगाव आदी भागांतही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख दशरथ तिवरे, मनोज विशे, अविनाश थोरात व अनेक पदाधिकारी यावेळी रस्त्यावर उतरले. 

वज्रेश्वरीतही प्रतिसाद
वज्रेश्वरी : वज्रेश्वरी आणि तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या अंबाडी नाका येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. वज्रेश्वरी तीर्थक्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. परंतु बंद असल्याने तुरळक प्रमाणात भाविक आले होते तर येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिला. मंगळवारी येथे आठवडी बाजार भरतो. तो येथील मोहन ठाकरे, केशव पाटील, मधुकर शिंदे, सुधाकर कोंडलेकर, दीपक पाटील, भालचंद्र पाटील, चंद्रकांत वेतूळकर या शेतकऱ्यांनी सकाळी सातपासून व्यापाऱ्यांना आवाहन करीत बंद केला. या वेळी सर्व शेतकऱ्यांनी वज्रेश्वरी देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला.  

कसारा बाजारपेठेत शुकशुकाट
कसारा : ‘भारत बंद’ला कसाऱ्यात व्यापारी मंडळ व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच कसारा बाजारपेठेत शांतता होती. व्यापारी मंडळाचे अध्यक्ष पवन अग्रवाल, महेश पेढेकर यांच्यासह भाजपवगळता सर्व पक्षाने या बंदला पाठिबा दिला. बंददरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये यांनी बंदोबस्त ठेवला होता. 

भिवंडीत कायदा मागे घेण्यासाठी निवेदन 
भिवंडी : भिवंडीतील सर्वपक्षीय नेते एकत्र येत शेतकरी व कामगार आंदोलन समर्थन समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना दिले. याप्रसंगी आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस ॲड. किरण चन्ने, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विश्वास थळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राकेश पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भगवान टावरे, काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. रशीद ताहीर मोमीन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, सुनील चव्हाण, विकास निकम आदी सहभागी झाली होते.

युवक काँग्रेसने काढली अंत्ययात्रा
भिवंडी : भिवंडीत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पश्चिम विधानसभा युवक अध्यक्ष राहुल पाटील व शहराध्यक्ष अरफात खान यांच्या नेतृत्वाखाली वंजारपट्टी नाका या ठिकाणी अंत्ययात्रा काढली. नीलेश झेडगे, बालाजी नवले, सारवजीत सिंग आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
अंबाडीत मोर्चा
भिवंडी : अंबाडी नाका येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया व आरपीआय सेक्युलर यांच्या वतीने मोर्चा काढला. आरपीआय सेक्युलरचे किरण चन्ने यांच्यासह बाळाराम भोईर, रमेश जाधव, प्रदीप तुंगार आदी यात सहभागी झाले.

Web Title: The call for Bharat Bandh received a good response in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे