व्यापाऱ्यांच्या नाकदुऱ्या; सेना-भाजपात श्रेयवाद
By Admin | Updated: March 25, 2017 01:25 IST2017-03-25T01:25:05+5:302017-03-25T01:25:05+5:30
शिवसेना व भारतीय जनता पार्टीमधील श्रेयवादाचे नाट्य गुरुवारी नौपाडा, कोपरी परिसरांतील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर पालिका प्रशासनाने केलेल्या ‘कचरा फेको’ आंदोलनानंतर

व्यापाऱ्यांच्या नाकदुऱ्या; सेना-भाजपात श्रेयवाद
ठाणे : शिवसेना व भारतीय जनता पार्टीमधील श्रेयवादाचे नाट्य गुरुवारी नौपाडा, कोपरी परिसरांतील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर पालिका प्रशासनाने केलेल्या ‘कचरा फेको’ आंदोलनानंतर हा तिढा संपुष्टात आणण्याकरिता रंगल्याची चर्चा आहे. महापालिका मुख्यालयात याच मुद्यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिकेने कचरा कराची वसुली करण्यासाठी गुरुवारी नौपाडा आणि कोपरीतील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरच कचरा टाकला. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी त्याविरोधात आवाज उठवत आयुक्तांचा निषेध केला. जोपर्यंत आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला होता. पालिकेने आणून टाकलेला कचरा न उचलल्याने व्यापाऱ्यांनी हा कचरा उचलून नौपाडा प्रभाग समिती कार्यालयासमोर आणून टाकला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. परंतु, या वेळी भाजपाचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले आणि त्यांच्या पॅनलमधील इतर नगरसेवक, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेऊन व्यापाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. कचरा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यासाठी या व्यापाऱ्यांनी थेट महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. महापालिका आयुक्तांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. परंतु, आयुक्त मुख्यालयात न आल्याने यावर मार्ग निघत नव्हता. अखेर, सायंकाळी भाजपा आ. संजय केळकर यांनी मुख्यालयातील अधिकाऱ्यांबरोबर संवादाची तयारी दर्शवली. (प्रतिनिधी)