पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्टचा मार्ग शिवसेनेने अखेर केला मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:12 AM2021-09-09T08:12:19+5:302021-09-09T09:38:37+5:30

बुलेट ट्रेनच्या जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर

Bullet train land transfer proposal approved pdc | पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्टचा मार्ग शिवसेनेने अखेर केला मोकळा

पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्टचा मार्ग शिवसेनेने अखेर केला मोकळा

Next
ठळक मुद्देमुंबईतील मेट्रोचे कारशेड आरे कॉलनीतून हलवून कांजूरमार्ग येथे उभारण्यावरून राज्य आणि केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी तणाव वाढला होता

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रॉजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता जमीन हस्तांतरणाचा ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने तब्बल चार वेळा फेटाळून लावलेला आणि दप्तरी दाखल केलेला प्रस्ताव बुधवारी झालेल्या महासभेत अवघ्या काही सेकंदात कोणत्याही चर्चेविना मंजूर झाला. बुलेट ट्रेनबाबतची विरोधाची भूमिका शिवसेनेने अचानक मवाळ केल्याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बुलेट ट्रेनकरिता ज्या शेतकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यांना मोबदला मिळाला असल्याने महापालिकेचे नुकसान कशासाठी करायचे, असे सांगत शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला.

मुंबईतील मेट्रोचे कारशेड आरे कॉलनीतून हलवून कांजूरमार्ग येथे उभारण्यावरून राज्य आणि केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी तणाव वाढला होता. त्यामुळे ठाणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने केंद्राच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला जागा हस्तांतरित करण्यास विरोध केला. महापालिका प्रशासनाकडून बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर चार वेळा मंजुरीसाठी आणूनही तो फेटाळण्यात आला व अखेर दफ्तरी दाखल केला. काही दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. त्यावेळी राज्य शासनाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेनंतर मोदी-ठाकरे यांच्यात बंद दरवाजाआड बैठक झाली होती. 

केंद्र सरकारने मेट्रो कारशेडकरिता कांजुरमार्ग येथील मिठागरांची जमीन दिल्यास बुलेट ट्रेनच्या जमीन संपादनातील अडथळे दूर करण्याबाबत उभय नेत्यांच्या बैठकीत समझोता झाल्याची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात गेले काही दिवस सुरू होती. बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे संकेत यापूर्वीच ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेने दिले होते. शिवसेनेकडून जागा हस्तांतरण प्रस्तावाला विरोध झाल्याने शेतकऱ्यांकडूनही नाराजी व्यक्त झाली होती. तसेच बहुतांश जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असल्याने शिवसेना हा प्रस्ताव मंजूर करण्यास अनुकूल असल्याचे बोलले जात होते. बुधवारी हा प्रस्ताव फारशा चर्चेविना मंजूर झाला.

मोबदल्यात ६.९२ कोटी  
n मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता ठाणे महापालिका शीळ भागातील तीन हजार ८४९ चौरस मीटर इतकी जमीन देणार 
असून, त्या बदल्यात महापालिकेला राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि. (एनएचएसआरसीएल) कडून ६,९२,८२००० रुपये मोबदला प्राप्त होणार आहे.

n ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावांतून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. 

n या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एनएचएसआरसीएल माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पात संपादित होणाऱ्या खासगी जमिनींसाठी प्रतिहेक्टर नऊ कोटी रुपये मोबदला दर निश्चित करण्यात आला आहे.

Web Title: Bullet train land transfer proposal approved pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.