भाईंदरमध्ये मध्यरात्री इमारतीत सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली
By धीरज परब | Updated: November 18, 2023 19:59 IST2023-11-18T19:59:07+5:302023-11-18T19:59:18+5:30
शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटे दिडच्या सुमारास दुकानांच्या छताचा भाग पदपथावर कोसळला .

भाईंदरमध्ये मध्यरात्री इमारतीत सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या रहदारीच्या असलेल्या नवघर मार्गावरील भानूपार्क ह्या सुमारे ३५ वर्ष जुन्या इमारतीचा सज्जा मध्यरात्री नंतर कोसळल्याने जीवित हानी टळली. अग्निशमन दलाने इमारत रिकामी करून रहिवाश्याना अन्यत्र हलवले आहे.
भानूपार्क ही चाळ पद्धतीची सुमारे ३५ वर्ष जुनी इमारत असून त्यात २४ सदनिका व तळ मजल्यावर दुकाने आहेत . नवघर मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी ही इमारत असून त्याला दोन वेळा पालिकेने नोटीस बजावली होती . परंतु इमारत मात्र रिकामी केली गेली नव्हती . ह्यात बहुतांशी भाडेकरू ठेवण्यात आलेले होते .
शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटे दिडच्या सुमारास दुकानांच्या छताचा भाग पदपथावर कोसळला . मध्यरात्री नंतरची वेळ असल्याने दुकाने बंद होती व लोकांची रहदारी नसल्याने सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही . अग्निशमन दलास घटनेची माहिती मिळताच त्यांनी पडलेला भाग हटवून रहिवाश्याना सुरक्षेच्या अनुषंगाने बाहेर काढले व रात्री त्यांची व्यवस्था जवळच्या लोकमान्य टिळक सभागृहात केली . त्या नंतर त्यांना एमएमआरडीच्या रेंटल योजनेतील घरां मध्ये तात्पुरते हलवण्यात आले आहे . इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून त्याचा अहवाल आल्या नंतर महापालिका निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले .