साखरझोपेतच झाली संसारांची माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:44 PM2020-09-21T23:44:14+5:302020-09-21T23:44:28+5:30

भिवंडी इमारत दुर्घटना २४ कुटुंबे आली उघड्यावर घटनास्थळी रहिवाशांचा आक्रोश

building collapse in bhiwandi early morning | साखरझोपेतच झाली संसारांची माती

साखरझोपेतच झाली संसारांची माती

googlenewsNext

नितीन पंडित।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : धामणकरनाका परिसरातील पटेल कम्पाउंड येथील तीन मजली जिलानी इमारत सोमवारी मध्यरात्री कोसळली आणि साखरझोपेत असलेल्या येथील अनेक रहिवाशांचे संसार क्षणार्धात जमीनदोस्त झाले. येथील बऱ्याच रहिवाशांचे कुटुंबीय इमारतीच्या मलब्याखाली दबल्याने त्यांनी एकच आक्रोश सुरू केला. कुणी आपल्या म्हाताºया आईवडिलांना, कुणी पतीपत्नीला, तर कुणी कुटुंबातील चिमुकल्या जीवाला मलब्याखाली जीवाच्या आकांताने शोधण्याचा प्रयत्न करत होते.


जिलानी इमारतीतील रहिवाशांसाठी सोमवारची रात्र काळरात्र ठरली. या इमारतीतील काही कुटुंबीयांनी एक, तर काही कुटुंबीयांनी एकापेक्षा जास्त सदस्यांना गमावले होते. अनेक कुटुंबीय इमारतीच्या ढिगाºयात त्यांच्या आप्तेष्टांना शोधण्याचा प्रयत्न करत होते. इमारत कोसळल्याचा आवाज ऐकून संपूर्ण परिसर झोपेतून जागा झाला होता. महानगरपालिकेची यंत्रणा घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करेपर्यंत या स्थानिकांनीच रहिवाशांना मलबा हटवण्यास मदत केली. इमारत कोसळल्यामुळे येथील जवळपास २४ कुटुंबे उघड्यावर आली आहेत.


नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही पतीपत्नी या दुर्घटनेतून वाचलो; मात्र आमचा तीन वर्षांचा सुखी संसार डोळ्यादेखत मोडला, याचे दु:ख वाटते, अशी प्रतिक्रिया या इमारतीचे रहिवासी शरीफ अन्सारी यांनी व्यक्त केली. शरीफ अन्सारी हे पत्रकार आहेत. तीन वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर त्यांनी या इमारतीत दुसºया माळ्यावरील सदनिकेत संसार थाटला होता. सोमवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास शेजारी शब्बीर कुरेशी यांनी इमारतीला तडे जात असल्याचे शरीफ यांना सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शरीफ यांनी क्षणाचाही विलंब न लावता दुसºया मजल्यावरील रहिवाशांचे दरवाजे ठोठावत इमारत खाली करण्यास सांगितले. पत्नीला इमारतीबाहेर काढल्यानंतर शरीफ पुन्हा नागरिकांना बाहेर काढण्यासाठी इमारतीत गेले. दुसºया मजल्यावरील रहिवाशांना उठवत असतानाच इमारतीचा एक भाग कोसळला. त्यामुळे शरीफदेखील अडकले होते. कसेबसे इमारतीबाहेर पडणे त्यांना शक्य झाले. मात्र, ते राहत असलेली सदनिका तोपर्यंत जमीनदोस्त झाली होती. जीव वाचला मात्र तीन वर्षांचा संसार डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याची भावनिक प्रतिक्रिया शरीफ यांनी व्यक्त केली. सोबतच, माझ्या डोळ्यांदेखत इमारतीतील हसतीखेळती चार मुले मरण पावली. ही दुर्घटना मी कधीही विसरू शकणार नाही. मला आणखी १० ते १५ मिनिटे मिळाली असती, तर कदाचित त्या चिमुकल्यांना मी वाचवू शकलो असतो, हे सांगताना शरीफ यांच्या अश्रूंचा बांध फुटला.


इतरांना वाचवणाºया शब्बीरचे स्वत:चे कुटुंब धोक्यात
इमारतीला तडे गेल्याची पहिली खबर रहिवाशांना देणारे शब्बीर कुरेशी हे पत्नी व चार मुलांसह दुसºया मजल्यावर राहतात. त्यांनी पत्नीला मुलांना घेऊन इमारतीबाहेर पडण्यास सांगितले. त्यानंतर, शब्बीर इतरांना जागे करण्यासाठी गेले आणि तेवढ्यात इमारत कोसळली.
शब्बीर व त्यांची दोन लहान मुले या दुर्घटनेतून वाचली; मात्र त्यांची पत्नी, चार वर्षांची मुलगी व दोन वर्षांचा मुलगा असे तीन जण ढिगाºयाखाली अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून दुपारपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.


धोकादायक इमारतीतील सदनिका दिल्या होत्या भाड्याने
भिवंडी : शहरातील धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेतून काही गंभीर मुद्दे उघडकीस आले आहेत. त्यानुसार, महानगरपालिका प्रशासनाने ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केल्यावरही येथील काही रहिवाशांनी त्यांच्या सदनिका भाड्याने देऊन निष्पाप, गरीब लोकांचे जीव धोक्यात घातल्याची माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारत ज्या पटेल कम्पाउंड परिसरात होती, त्या ठिकाणी अतिशय दाटीवाटीने इमारती आहेत. एकमेकांना खेटूनच इमारती उभ्या केल्याने बचावकार्यात अनंत अडचणी आल्या.
जवळपास ३७ वर्षे जुन्या या इमारतीला मनपा प्रशासनाने धोकादायक ठरवले होते. त्यानुसार, नोटीस बजावून मनपा प्रशासनाने हात झटकले. त्याचप्रमाणे इमारतमालकानेही सुरुवातीलाच सदनिका विकून हात वर केले. पालिकेने इमारत धोकादायक ठरवल्यानंतर काही सदनिकांच्या मालकांनी आपापल्या सदनिका खाली केल्या; मात्र पैशांच्या हव्यासापोटी त्या पुन्हा भाड्याने दिल्या. कमी भाड्याच्या लालसेतून शहरातील कामगारांनी या इमारतीत आपला संसार थाटला होता. घरमालकांनी भाड्याच्या लालसेने गरीब भाडोत्री कुटुंबीयांच्या जीवाची कोणतीही पर्वा केली नाही, हे दुर्दैव. भाड्यापोटी दोन पैसे वाचवण्याच्या मोबदल्यात आपल्या कुटुंबीयांना मृत्यूच्या दाढेत कसे ठेवले होते, याची जाणीव आज येथील प्रत्येक गरीब मजूर रहिवाशांना झाली. या दुर्घटनेतील मृतांमध्ये काही अजाण मुलांचाही समावेश आहे. या निष्पाप जीवांना मरणानंतर तरी न्याय मिळेल का, हाच खरा प्रश्न आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भिवंडीत धोकादायक इमारतींचा प्रश्न या दुर्घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. ज्याज्या वेळी भिवंडीत एखादी इमारत दुर्घटना होते, त्यात्या वेळी क्लस्टर योजना राबविण्याचा मुद्दा पुढे येतो; मात्र त्यासाठी आवश्यक बाबींचा पाठपुरावा कधीच होत नाही. त्यामुळे शहरात अनधिकृत बांधकामे व धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मनपा प्रशासन फक्त नोटीस बजावून हात झटकण्याचा प्रयत्न करते; मात्र इमारत धोकादायक ठरवल्यानंतर तेथील रहिवाशांचा विचार होत नसल्याने हजारो नागरिक आजही धोकादायक इमारतींमध्ये भाड्याने राहत आहेत. त्यामुळे आता तरी मनपा प्रशासन जागे होणार का, असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.

Web Title: building collapse in bhiwandi early morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.