Builder committed billions of customer fraud, crime against four | बिल्डरने केली ग्राहकांची कोट्यवधींची फसवणूक,चौघांवर गुन्हा

बिल्डरने केली ग्राहकांची कोट्यवधींची फसवणूक,चौघांवर गुन्हा

कल्याण : ग्राहकांकडून पैसे घेऊनही त्यांना सदनिकेचा ताबा न देणाऱ्या चार बिल्डरांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. हसमुख पटेल (रा. उल्हासनगर), जीगणेश मणियार, रितू वासनिक आणि राज रंगनाथन (सर्व रा. कल्याण) अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरांची नावे आहेत. या चौघांनी ११ ग्राहकांची पाच कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खडकपाडा परिसरात राहणाºया आशीष झुंजारराव (४०) यांनी बिर्ला महाविद्यालयासमोरील पटेल कोलेसिसमध्ये सदनिका बुक केली होती. झुंजारराव यांनी त्यासाठी पटेल ग्रुप आॅफ कंपनीचे बिल्डर हसमुख पटेल याला २०१२ मध्ये रोख तसेच धनादेशाद्वारे ११ लाख ८४ हजार रुपये दिले. तर, उर्वरित ४१ लाख ६३ हजार ५६० रुपयांचे गृहकर्ज एका बँकेकडून ट्रायपार्टी अ‍ॅग्रीमेंटच्या माध्यमातून मंजूर करून घेतले. ही रक्कम टप्प्याटप्प्याने देणे बंधनकारक असतानाही बँकेने रक्कम परस्पर बिल्डरला अदा केली.
त्यानंतरही आशीष यांना सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही. त्याचबरोबर इतर १० जणांची पाच कोटी सात लाख ६३ हजार ८८० रुपयांची फसवणूक केली.
याबाबत वारंवार बिल्डरकडे जाऊनही त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने फसवणूक झालेल्या ११ जणांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पटेलसह मणियार, वासनिक आणि रंगनाथन यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
>ट्रायपार्टी अ‍ॅग्रिमेंटमध्ये दिलेल्या अटी आणि शर्थींनुसार नियमित व्याज न भरल्याने संबंधित बँकेकडून कारवाईच्या नोटिसा पाठवून ग्राहकांसह त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देण्यात येत आहे.

Web Title: Builder committed billions of customer fraud, crime against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.