‘डेब्रिज आॅन कॉल’चा सावळा गोंधळ
By Admin | Updated: June 30, 2017 02:42 IST2017-06-30T02:42:08+5:302017-06-30T02:42:08+5:30
केडीएमसी मुख्यालयातील आपत्कालीन कक्षात डेब्रिज उचलण्यासाठी नागरिकांचे दूरध्वनी येऊ लागले आहेत. त्यामुळे या कक्षातील कर्मचारी पुरते हैराण झाले आहेत.

‘डेब्रिज आॅन कॉल’चा सावळा गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी मुख्यालयातील आपत्कालीन कक्षात डेब्रिज उचलण्यासाठी नागरिकांचे दूरध्वनी येऊ लागले आहेत. त्यामुळे या कक्षातील कर्मचारी पुरते हैराण झाले आहेत. एकीकडे मुसळधार पावसात पाणी तुंबण्याच्या घटनांची माहिती देणारे दूरध्वनी वाढले असतानाच दुसरीकडे डेब्रिजसाठी दूरध्वनी येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांना नागरिक व लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी केडीएमसी आपत्कालीन कक्ष स्थापन करते. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि बचावकार्य विनाविलंब सुरू व्हावे, हा त्यामागचा उद्देश असला तरी अपुरी साधनसामग्री आणि कर्मचाऱ्यांच्या उपलब्धता, यावर या कक्षांचेही तीनतेरा वाजल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
पर्यावरणदिनी केलेला संकल्प आणि शहर स्वच्छता अभियानांतर्गत रस्ते व पदपथ धूळ, डेब्रिजमुक्त ठेवण्याबाबत आवाहन करण्यासाठी महापालिकेने ‘डेब्रिज आॅन कॉल’ हा उपक्रम हाती घेतला आहे. डेब्रिज उचलण्यासाठी कंत्राटदारही नेमला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते जूनच्या पहिल्या आठड्यात झाले. त्या वेळी महापौरांनी स्वत: या उपक्रमासाठी दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून त्याचा शुभारंभ केला होता. मात्र, डेब्रिज उचलण्यासाठी जाहीर केलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास तो आपत्कालीन कक्षाशी जोडला जात आहे.
डेब्रिज उचलण्यासाठी येणाऱ्या दूरध्वनीमुळे कर्मचारी पुरते हैराण झाले आहेत. दूरध्वनी करूनही कार्यवाही न झाल्याने एका नगरसेविकेच्या पतीने येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अनिल लाड म्हणाले की, ‘डेब्रिज आॅन कॉल’ उपक्रमाचा टोल फ्री क्रमांक आपत्कालीन कक्षाशी जोडणे चुकीचे आहे. यामुळे डेब्रिजच्या कॉलसाठी कंत्राट दिले असताना सर्वाधिक कॉल आमच्या कर्मचाऱ्यांना उचलावे लागत आहेत. क्रमांक बदलून घेण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या जातील, असे ते म्हणाले.