साकुर्ली-गुंडे रस्त्यावरील पुलास भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:10 IST2019-08-07T23:10:31+5:302019-08-07T23:10:39+5:30
संततधार पावसामुळे पुलावर मोठे भगदाड पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

साकुर्ली-गुंडे रस्त्यावरील पुलास भगदाड
किन्हवली: डोळखांब भागातील तालुक्याचे शेवटचे टोक व दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या कांबे गावाजवळील साकुर्ली-कांबे-गुंडे येथील रस्त्यावरील पूल हा मोडकळीस आला असून संततधार पावसामुळे पुलावर मोठे भगदाड पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
यापूर्वीही स्थानिक ग्रामस्थांनी हा पूल दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन पुलासाठी आजी व माजी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून समस्या सोडवण्यासाठी अनेक आश्वासने दिली. मात्र, आजही पूल जैसे थे अवस्थेत आहे. दरवर्षी नदीच्या पुरात पुलाचे बांधकाम वाहून जात असून खड्डे पडून पूल अतिशय जीर्ण होत चालला आहे. पुलावर सध्या येथील स्थानिक नागरिक नदीतील दगडगोट्यांचा वापर करून जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. अवजड वाहन जाऊ शकत नसल्याने बससेवाही बंद आहे.