उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडील पादचारी पुल धोकादायक?; वाहनांवर बंदी घालण्याची मागणी
By सदानंद नाईक | Updated: August 22, 2022 18:46 IST2022-08-22T18:45:45+5:302022-08-22T18:46:09+5:30
महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे.

उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडील पादचारी पुल धोकादायक?; वाहनांवर बंदी घालण्याची मागणी
उल्हासनगर - रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील वालधुनी नदीवरील एकमेव पादचारी पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ वाढली असून पूल धोकादायक झाला आहे. पुलाची वेळीच दुरुस्ती केली नाहीतर, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता चाकरमानी, शाळा, महाविद्यालयाच्या मुले व्यक्त करीत आहेत.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे सी.एच.एम. कॉलेजकडुन जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पादचारी पुल चाकरमानी, नागरिक, शाळा व महाविद्यालयातील मुलांसाठी येण्या-जाण्यासाठी बांधण्यात आला होता. दरम्यान पुलाच्या मधोमध असलेले लोखंडी खांब काढून टाकण्यात आल्याने, मोटरसायकली, ऑटो रिक्षा यांची ये-जा पादचारी पुलावरून सुरू झाली. त्यामुळे पुलावरील दगडी फरसी उखळली असून जादाच्या भाराने पूल कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करीत आहेत. दरम्यान पश्चिमेकडील दुसरा व जुना संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील पूल पाडून, त्याठिकाणी नवीन पुल बनविण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा एकमेव पादचारी पुल सुरू आहे.
महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे. स्टेशनकडे जाणारा मात्र वालधुनी नदीवरील हा एकमेव पादचारी पूल जुना असून जादाच्या वाहतुकीने धोकादायक झाल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. संजय गांधीनगरकडे जाणाऱ्या पुलाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने, पुलाचे काम जलद सुरू करण्याची मागणी होत आहे. मोठा अपघात घडण्यापूर्वी महापालिकेने सी.एच.एम कॉलेज कडुन पादचारी पुलावरुन जाणाऱ्या मोठ्या वाहनाना बंदी घालावी. अशी मागणीने जोर पकडला आहे.