गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी मागितली लाच

By Admin | Updated: June 17, 2016 03:11 IST2016-06-17T03:11:54+5:302016-06-17T03:11:54+5:30

अंबरनाथमधील एका बांधकाम व्यवसायिकाचा जागेवरून वाद झाल्याने, या प्रकरणी गुन्हा दाखल करताना अंबरनाथ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने या बांधकाम व्यवसायिकाचे नाव

Bribe asked to remove name from crime | गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी मागितली लाच

गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी मागितली लाच

अंबरनाथ : अंबरनाथमधील एका बांधकाम व्यवसायिकाचा जागेवरून वाद झाल्याने, या प्रकरणी गुन्हा दाखल करताना अंबरनाथ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने या बांधकाम व्यवसायिकाचे नाव न टाकता त्याच्या लहान भावाचे नाव टाकले. या लहान भावाचे नाव गुन्ह्यातून काढण्यासाठी या बांधकाम व्यवसायिकाकडे लाच मागितली. पोलीस अधिकाऱ्याच्या या कृत्याचे चित्रीकरण आणि कॉल रेकॉडिंग करून त्या बांधकाम व्यवसायिकाने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. एक लाख रुपये घेतल्यावर संबंधित अधिकाऱ्याने गुन्ह्यातून त्या बिल्डरचे नावदेखील वगळले आहे.
कमलाकरनगर येथे द्वारकादास वाधवा यांच्या गृहसंकुलाचे काम सुरू आहे. त्यांनी नव्याने घेतलेल्या जागेवर एका घर मालकिणीसोबत त्यांचे आर्थिक व्यवहारावरून किरकोळ वादही आहेत. या घरमालकिणीने वाधवाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. मात्र, गुन्हा दाखल करताना सहायक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी कोणतीही शहानिशा न करता, द्वारकादास यांचा लहान भाऊ सुरेश यांचे नाव एफआयआरमध्ये टाकले.
या संदर्भात सुरेश यांनी विचारणा केल्यावर त्यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. अखेर आंधळे यांनी सुरेश यांच्या एका सहकार्याला आर्थिक तडजोड केल्यावर नाव वगळतो, असे सांगितले. आंधळे यांच्या या थेट पैसे मागण्याच्या वृत्तीचा पर्दाफाश करण्यासाठी सुरेश यांनी या सर्व व्यवहाराचे चित्रीकरण आणि आॅडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आंधळे यांनी वाधवा यांच्या निकटवर्तीयांकडे पैशांची मागणी केली. हे पैसे घेण्यासाठी स्वत: आंधळे कल्याणमधील खडकपाडा परिसरात आले होते, असा आरोप वाधवा
यांनी पत्रकार परिषदेत केला. पैसे घेतल्याचे सर्व पुरावे त्यांनी पोलीस आयुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिले. पैसे घेतल्यावर गुन्ह्यातून नाव कसे काढणार, याचे आॅडिओ रेकॉर्डिंगही वाधवा यांनी केले आहे. पैसे घेतल्याचे कुणालाही कळणार नाही, याची दक्षता घेण्याचेही आंधळे यांनी वाधवा यांना बजावले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

सहायक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह बिल्डरची सहायक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यामुळे पोलीस व व्यावसायिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून, त्यांच्यातील आर्थिक हितसंबंध या प्रकरणात पुन्हा उघड झाले.

Web Title: Bribe asked to remove name from crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.