सोनसाखळी चोरणारे दोघे अटकेत
By Admin | Updated: April 26, 2017 00:19 IST2017-04-26T00:19:58+5:302017-04-26T00:19:58+5:30
ठाणे जिल्ह्यातील टॉप २० सोनसाखळी चोरट्यांच्या यादीतील दोन चोरट्यांना कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एकाचे

सोनसाखळी चोरणारे दोघे अटकेत
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील टॉप २० सोनसाखळी चोरट्यांच्या यादीतील दोन चोरट्यांना कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एकाचे नाव मम्मू उर्फ वसिस संजय इराणी (२२) आहे. तर दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. ते दोघेही आंबिवलीतील इराणी वस्तीमध्ये राहणारे आहेत. चोरीच्या १७ मोटरसायकल व १० किमती मोबाइल त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.
पार्किंगमधील मोटरसायकली ते चोरत असत. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा मोबाइल चोरीकडे वळवला होता. धावत्या रेल्वे गाडीत दरवाज्याजवळ मोबाइलवर बोलणाऱ्या प्रवाशांना हेरून ते त्यांच्या हतावर फटका मारत असत. मोबाइल खाली पडल्यानंतर तो ते चोरत असत. सोनसाखळी चोरण्यासाठी ते चोरीच्या मोटरसायकल वापरत असत. आरोपींकडून हस्तगत केलेल्या १७ मोटरसायकलची किंमत आठ लाख ८५ तर १० मोबाइलची किंमत एक लाख रुपये आहे. त्यांच्या अटकेमुळे मोटरसायकल चोरीचे १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. अल्पवयीन आरोपीची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात येणार आहे.
उल्हासनगरचे पोलीस पथक काही दिवसांपूर्वी आंबिवलीतील इराणी वस्तीत सोनसाखळी चोर पकडण्यासाठी गेले असताना तेथील महिलांनी त्यांच्यावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. अल्पवयीन आरोपीचा या गुन्ह्यातही सहभाग आहे, असे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)