डोंबिवलीतील एसटी स्टँडमध्ये बॉम्बची अफवा
By Admin | Updated: June 17, 2016 02:12 IST2016-06-17T02:12:14+5:302016-06-17T02:12:14+5:30
स्मार्ट सिटीसंदर्भातील परिषेदसाठी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पूर्वेतील एमआयडीसीतील एसटी स्टँडममधील एका बेवारस खोक्यात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनमुळे

डोंबिवलीतील एसटी स्टँडमध्ये बॉम्बची अफवा
डोंबिवली : स्मार्ट सिटीसंदर्भातील परिषेदसाठी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पूर्वेतील एमआयडीसीतील एसटी स्टँडममधील एका बेवारस खोक्यात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनमुळे यंत्रणांची धावपळ उडाली. टिळकनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी आलेल्या फोननंतर पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता त्यांना रिकामा खोका आढळला. ही अफवा असल्याचे स्पष्ट होताच पोलीस आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
एसटी स्टँडमधील एका बाकावर दुपारी बेवारस खोका आढळल्याने प्रवाशांत घबराट पसरली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात निनावी फोन आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी स्टँडमधून प्रवाशांना दूर नेण्यात आले. काही वेळातच बॉब शोधक व नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. खोक्याची तपासणी केल्यावर तो रिकामा असल्याचे स्पष्ट झाले. कुणीतरी खोडसाळपणाने हा खोका जाणून बुजून तेथे ठेवला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला.
डोंबिवली हे दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्य असेल, असा व्हिडिओ इसिसने जारी केला होता. तसेच कल्याणमधील काही तरूण इसिसमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी मंदिरांची तपासणीही करण्यात आली होती.
दरम्यान, स्मार्ट सिटीच्या शिखर परिषदेसाठी मुख्यमंत्री शुक्रवारी कल्याणमध्ये येणार असतानाच आदल्या दिवशी बॉम्बचा निनावी फोन आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते.
(प्रतिनिधी)