सोशल मीडियामुळे बिनधास्तपणा
By Admin | Updated: February 5, 2017 03:16 IST2017-02-05T03:16:10+5:302017-02-05T03:16:10+5:30
बदललेले वातावरण, बदललेला काळ आणि माध्यमे यांच्याशी दोस्ती करत नवी पिढी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या हिमतीवर लिहिते आहे. सोशल मीडियामुळे

सोशल मीडियामुळे बिनधास्तपणा
पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : बदललेले वातावरण, बदललेला काळ आणि माध्यमे यांच्याशी दोस्ती करत नवी पिढी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या हिमतीवर लिहिते आहे. सोशल मीडियामुळे तो बिनधास्त झाला आहे, पण बेजबाबदार नक्कीच नाही, असा विश्वास टाकणारा सूर डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात झालेल्या ‘नवोदित लेखन : अपेक्षा आणि आव्हाने’, ‘नवे लेखक : नवे कवी’ या चर्चासत्रात उमटला. या दोन परिसंवादांनंतर ‘नवे कवी : नवी कविता’मध्ये वेगवेगळ्या विषयांवर पाच कवींनी दर्जेदार कविता सादर करून या चर्चेचा सूर अधोरेखित केला.
‘नवोदित लेखन : अपेक्षा आणि आव्हाने’ या चर्चेत आजच्या आघाडीच्या लेखिका मनस्विनी लता रवींद्र, प्रशांत आर्वे, रवी कोरडे, घन:श्याम पाटील सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सचिन केळकर यांनी केले. नवोदित लेखकांपुढील आव्हानांचा वेध घेताना प्रस्थापितांचे आव्हान नवोदितांना मोठे असल्याचे सांगून, घन:श्याम पाटील यांनी लेखक, प्रकाशक आणि प्रसिद्धिमाध्यमे नवोदितांना संधी देत नसल्याची खंत व्यक्त केली. समाजमाध्यमांमुळे आपले पेनाचे नाते तुटणार की काय, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. नवोदित लेखक इतरांचे लेखन वाचत नाहीच; पण स्वत:चेही लेखन वाचत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मनस्विनी लता रवींद्र यांनी लेखक असल्याचे सांगितल्यानंतर ‘पोटापाण्यासाठी काय करता?’ असा प्रश्न विचारला जात असल्याचे निरीक्षण मांडले. त्यातून लेखनि हे आपल्या रोजगाराचे साधन अजूनही झाले नसल्याचे अधोरेखित केले. मला एखाद्या विषयावर संशोधन करून लिहायचे असेल, तर मी पोटापाण्याच्या साधनांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे ते लेखनकार्य करण्यात अडचणी निर्माण होतात, अशी वास्तविकता त्यांनी मांडली. रवींद्र कोरडे यांनी नवोदितांचे आपल्याच कलाकृतींवर प्रेम करण्याचे धोके उदाहरणांसह समजावून सांगितले. प्रशांत आर्वे यांनी बदलत जाणाऱ्या काळाची गती नवोदितांना पकडता आली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पहिल्या चर्चेचा हा धागा घेऊन ‘नवे कवी : नवे लेखन’ या चर्चेत आजचे आघाडीचे लेखक, कवी आणि कलाआस्वादक आशुतोष जावडेकर यांनी बदलत्या काळात नवे लेखक समाजमाध्यमांच्या माध्यमातून बिनधास्त व्यक्त होण्याचे समर्थन करीत, सोशल मीडियावरचे साहित्य नवोदितांना समृद्ध करणारे असल्याचे मत व्यक्त केले. नवलेखकांत विषयांची विविधता आहे. एकच लेखक स्वत: कवी असतो, तो समीक्षाही करतो, तो वेगवेगळे माध्यम वापरतो. या पिढीमध्ये फोर्स आणि तो कोणाला काय वाटेल, याची तमा बाळगत नाही, असे विचार व्यक्त केले. या चर्चेचे सूत्रसंचालन श्रीधर नांदेडकर यांनी केले. आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आशुतोष आणि त्यांच्या आधीच्या पिढीच्या लेखिका, साहित्य आस्वादक, समीक्षक डॉ. अरुंधती वैद्य यांना बोलते केले. डॉ. वैद्य म्हणाल्या, आपले सत्त्व जोपासून लेखकाने लिहिते राहिल्यास त्याच्या पाठीमागे कुणी राहिले नाही, तरी तो त्याच्या लेखनातून सिद्ध होत असतो, असे मत व्यक्त केले.
या दोन्ही चर्चासत्रांनंतर ‘नवे कवी : नवी कविता’ यात निवडक पाच कवींचे काव्यवाचन झाले. हर्षदा सौरभ, चेतन फडणीस, माधवी मुठाळ, डॉ. गिरीश खारकर आणि गोविंद नाईक यांनी त्यांच्या रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली. या सादरीकरणाचे सूत्रसंचालन पवन नालट यांनी केले. (प्रतिनिधी)