दारूच्या नशेत मुलींची छेड काढणाऱ्याचा खून
By Admin | Updated: May 31, 2016 03:07 IST2016-05-31T03:07:39+5:302016-05-31T03:07:39+5:30
दारूच्या नशेत मुलींची छेड काढणाऱ्या २५ वर्षीय नंदकिशोर यादव याचा खून झाल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली

दारूच्या नशेत मुलींची छेड काढणाऱ्याचा खून
ठाणे : दारूच्या नशेत मुलींची छेड काढणाऱ्या २५ वर्षीय नंदकिशोर यादव याचा खून झाल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. बारावीच्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नालासोपाऱ्यामधील १० जण रविवारी सकाळी लोणावळ्यातील एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते. त्यामध्ये चार युवती आणि सहा युवकांचा समावेश होता. हे सर्व जण एकमेकांचे नातेवाईक आहेत. दर्शन आटोपून हे सर्व जण नालासोपाऱ्यातील घरी कारमधून परतत होते. प्रवासादरम्यान भूक लागल्यामुळे कापूरबावडीनाक्यावर कार थांबवून काही जण हॉटेलमध्ये गेले. त्या वेळी कारमध्ये दोन युवती आणि एक युवक थांबला होता. दारूच्या नशेत असलेल्या नंदकिशोर यादव कारजवळ येऊन त्या युवतींची छेड काढत होता. त्याच वेळी हॉटेलमधून परतलेल्या युवकांनी तसेच कारचालकाने हा प्रकार पाहून त्याला धक्काबुक्की केली आणि त्यानंतर हे सर्व जण कारने नालासोपाऱ्याच्या दिशेने निघून गेले. मात्र, धक्काबुक्कीत डोक्याला मार लागून नंदकिशोरचा जागीच मृत्यू झाला. कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कारचालक संदीप काकडे याच्यासह अक्षय राऊत आणि १७ वर्षांचा मुलगा अशा तिघांना अटक केली.