उल्हासनगर : शहरात दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या केशरी फाउंडेशन आणि नवपंख फाउंडेशन यांनी एकत्र येत केशरी ब्लड बँक सुरु केली. कॅम्प नं-३ येथे सुरु झालेल्या ब्लड बँकेचे उदघाटन रविवारी मान्यवारांच्या हस्ते होऊन, रक्तदान केंद्राने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
उल्हासनगरात ब्लड बॅंक नसल्याने, येथील नागरिकाना कल्याण किंवा डोंबिवली येथे रक्त घेण्यासाठी जावे लागत होते. नागरिकांची ही समस्या दूर करण्यात केशरी फॉउंडेशन व नवपंख फौंडेशन या सामाजिक संस्थेला यश आले. शहरात सुसज्ज अशी ब्लड बॅंक असावी अशी संकल्पना इमरजेंसी टीम मधे सर्वानुमते मांडण्यात आली. तेव्हा सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी होकार दर्शवुन केशरी ब्लड बॅंक या नावाने सेंटर सुरु करण्यावर एकमत झाले. ५ वर्ष्याच्या अथक परिश्रमानंतर रविवारी आमदार कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, माजी आमदार पप्पु कालानी, मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे, भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या हस्ते केशरी ब्लड बॅंकेचे उद्घाटन झाले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक व व्यापारी मंडळाचे पदाधिकारी आदीची उपस्थिती होती.
केशरी ब्लड सेंटरचे संस्थापक किशोर बडगुजर, ललित पाटील, केशरी मित्र मंडळ व नवपंख फाऊंडेशन यांचे पदाधिकारी सतीश मराठे, रेखा ठाकूर, शिवाजी रगडे, अमोल देशमुख, रुपेश पाटील, सचिन साळवी, पवन पचगाडे व अन्य सहकारी यांच्या पाच वर्षापासुन सुरु असलेल्या अथक प्रयत्नातून ही ब्लड बॅंक उभी झाली. येथे प्लेटलेट्स आणि प्लाज़्मा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उल्हासनगरसह आसपासच्या नागरिकांसाठी वेळेवर रक्त उपलब्ध करुन देण्यात येणारे हे एकमेव केंद्र असणार आहे.