BJP's sit-in agitation due to postponement of general assembly | महासभा स्थगित केल्याने भाजपचे ठिय्या आंदोलन

महासभा स्थगित केल्याने भाजपचे ठिय्या आंदोलन


लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : स्थायी व विशेष समिती सदस्य निवडीसाठी मंगळवारी बोलावलेली महासभा गणपूर्ती नसल्याचे कारण पुढे करून पीठासीन अधिकारी यांनी स्थगित केली. महासभा स्थगित केल्याच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे शहराध्यक्ष जमानुदास पुरास्वानी यांनी सांगितले. तसेच महापौर, आयुक्त यांना पत्र देऊन त्यांनी विशेष महासभा तीन दिवसांत बोलावण्याची विनंती केली आहे.
उल्हासनगर महापालिका स्थायी व एकूण ८ विशेष समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी सरकारच्या आदेशानुसार विशेष महासभा बोलावली होती. दुुपारी १२ वाजता महासभा सुरू झाल्यानंतर ४ मिनिटांत महासभेत गणपूर्ती नसल्याचे कारण देत पीठासीन अधिकाऱ्यांनी सभा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाजप नगरसेवकांनी महापालिका सचिव कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत ‘शिवसेनेने लोकशाहीचा गळा घोटला,’ असा आरोप केला. पुरास्वानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, राजेश वाधरिया आदींनी याचा निषेध करून न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. महापौर, आयुक्त यांना पत्र देऊन तीन दिवसांत विशेष महासभा बोलावण्याची मागणी केली. महासभेत गणपूर्ती होत नसेल तर पीठासीन अधिकाऱ्यांनी ५ मिनिटांच्या अंतराने तीन वेळा बेल वाजविण्याचा नियम असल्याची माहिती नगरसेवक रामचंदानी यांनी दिली. महासभेत स्थायी व विशेष समिती सदस्यपदाची निवड झाली असती तर, समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत राहून सर्व समित्यांची सभापतीपदे भाजपकडे गेली असती. एक वर्षापासून भाजपतील ओमी कलानी समर्थक नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत.
ओमी टीम समर्थक भाजपमधील नगरसेवकांना स्थायी व विशेष समिती सदस्यपदी निवड न करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतल्याने शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, स्थायी व विशेष समित्या ताब्यात ठेवण्यासाठी ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांना गोंजारण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे.

भाजपकडून ओमी टीमला आमिष?
भाजपमधील ओमी कलानी टीम समर्थक १० नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत बंडखोरी केल्याने, महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेला भाजप तोंडघशी पडला. स्थायी व एकूण ८ विशेष समिती सदस्य निवडीत वाटा देण्याचे आमिष कलानी समर्थक नगरसेवकांना दाखविल्याचे बोलले जात असून सर्व समिती सभापतीपदे भाजपच्या ताब्यात राहतील, असा दावा नगरसेवक मनोज लासी, जमानुदास पुरास्वानी यांनी केला आहे.

Web Title: BJP's sit-in agitation due to postponement of general assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.