भाजपाचा शिवसेनेला जायंट ‘दे धक्का ’
By Admin | Updated: September 2, 2016 03:43 IST2016-09-02T03:43:35+5:302016-09-02T03:43:35+5:30
काही दिवसांपूर्वीच झालेल्या प्रभाग क्र. ३२ अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसला पराभवाची धूळ चारण्याचे काम करणारे आणि जायंट किलर ठरलेले

भाजपाचा शिवसेनेला जायंट ‘दे धक्का ’
ठाणे : काही दिवसांपूर्वीच झालेल्या प्रभाग क्र. ३२ अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसला पराभवाची धूळ चारण्याचे काम करणारे आणि जायंट किलर ठरलेले, काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांच्यासह अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या स्वाती देशमुख यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. घाडीगावकर यांचा भाजपा प्रवेश हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात असून यामुळे शिवसेना नेते तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
प्रभाग क्र. ३२ अ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार स्वाती देशमुख या निवडून आल्या आहेत. परंतु, अवघ्या तीनच दिवसांत त्यांनी भाजपात प्रवेश केला. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि भाजपाला धूळ चारून जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनीदेखील अचानक भाजपामध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे त्यांना शिवसेनेत खेचण्यासाठी एका आमदाराने आपली ताकद पणाला लावली होती. परंतु, त्यांची ही खेळी अपुरी ठरल्याचे आता म्हणावे लागणार आहे. घाडीगावकर यांनी स्वबळावर स्वाती देशमुख यांचा विजय खेचून आणला होता. त्यामुळे भविष्यात किसननगर, भटवाडी भागांत याचे पडसाद उमटणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का बसला आहे. तर, काँग्रेसलादेखील हा धक्का पचवणे कठीण जाणार आहे.
काँग्रेसमध्ये का थांबायचे, ज्या वेळेस माझ्यावर हल्ला झाला, त्या वेळेस काँग्रेसने कोणते सहकार्य केले. त्यामुळे त्यांना माझी गरज नाही, तर मग का पक्षात राहायचे. भाजपाने माझ्या अटी, शर्ती मान्य केल्याने मी हा निर्णय घेतला.
- संजय घाडीगावकर,
माजी नगरसेवक