भाजपाची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात

By Admin | Updated: April 20, 2017 04:06 IST2017-04-20T04:06:29+5:302017-04-20T04:06:29+5:30

एकीकडे स्थायी समितीच्या मुद्यावरून सध्या शिवसेनेचा न्यायालयीन लढा सुरू असताना भाजपाने अद्यापही आपली

BJP's role is still in the gulastasta | भाजपाची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात

भाजपाची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात

ठाणे : एकीकडे स्थायी समितीच्या मुद्यावरून सध्या शिवसेनेचा न्यायालयीन लढा सुरू असताना भाजपाने अद्यापही आपली भूमिका जाहीर न केल्याने ते कोणाला टाळी देणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीने भाजपाच्या जीवावर सभापतीपदाचा दावा केल्याने बिथरलेल्या शिवसेनेकडून आता पहारेकऱ्याला आत घेण्याचे मनसुबे रचले जात आहेत.
एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर शिवसेनेला २०१२ प्रमाणेच स्थायी समितीच्या चाव्या आपल्याकडे घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या गटनेत्याने शिवसेनेला पाठिंबा दिला असताना त्यांच्या दोन नगरसेवकांनी मात्र राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने शिवसेनेची स्थायी समितीची गणिते फिसकटल्याचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे स्थायीच्या चाव्या कोणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. इकडे काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीने थेट सभापतीपदावर दावा केला आहे. त्यासाठी भाजपा आपल्यासोबतच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे शिवसेना न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत असून निर्णय विरोधात गेला, तर त्यांचीदेखील भाजपाला आपलेसे करण्यासाठी तयारी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, यासंदर्भात भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असता अद्याप कोणाच्या बाजूने जायचे, याचा निर्णयच झाला नसल्याची त्यांनी भूमिका विशद केली आहे. परंतु, शिवसेनेबरोबर जायचे झाल्यास एक वर्ष स्थायी समितीचे सभापद मिळावे, अशी अपेक्षा मात्र त्यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीबरोबर गेल्यास लॉटरी पद्धतीने सभापतीपदाची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने त्यांना टाळी देण्याचा सध्यातरी विचार नसल्याचेही भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. एकूणच स्थायीचा चेंडू भाजपाच्या कोर्टात येऊन विसावला असून तो कसा टोलवायचा, यासाठी और कुछ दिन इंतजार करो, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's role is still in the gulastasta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.