पक्षांतरासाठी भाजपाचे दबावतंत्र
By Admin | Updated: October 3, 2015 03:23 IST2015-10-03T03:23:37+5:302015-10-03T03:23:37+5:30
पक्षांतरासाठी भाजपाकडून मनसेच्या कार्यकर्त्यांवर दबाव येत असल्याचा आरोप मनसेचे केडीएमसीतील स्वीकृत नगरसेवक शरद गंभीरराव यांनी केला आहे.

पक्षांतरासाठी भाजपाचे दबावतंत्र
कल्याण : पक्षांतरासाठी भाजपाकडून मनसेच्या कार्यकर्त्यांवर दबाव येत असल्याचा आरोप मनसेचे केडीएमसीतील स्वीकृत नगरसेवक शरद गंभीरराव यांनी केला आहे. भाजपाच्या दबावतंत्राबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत पोलिसांनी कारवाई न केल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
भाजपाचे ग्रामीण उपाध्यक्ष महेश पाटील यांच्याकडून हा दबाव येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून जीवे मारण्याची धमकीही दिली जात असून याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यासह अन्य दोन जणांविरोधात तक्रार दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपाची डोंबिवलीत विकास परिषद होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना आणि मनसेच्या काही नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन भाजपा शक्तिप्रदर्शन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यातच, आता गंभीरराव यांनी केलेले आरोप पाहता पक्षांतराच्या मुद्यावरून वातावरण चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत. पाटील प्रभाग क्रमांक ८२, अंबिकानगर प्रभागातून इच्छुक आहेत. गंभीररावही तेथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या आरोपांबाबत पाटील यांनी लोकमतसह गंभीरराव यांचे आरोप निरर्थक असून आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.