ठाण्यात अवाजवी वीज बिलांविरोधात भाजपाची लोकचळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 19:32 IST2020-08-11T19:32:16+5:302020-08-11T19:32:45+5:30
अवाजवी वीज बिलांविरोधात भाजपाने केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली लोकचळवळ सुरु केली आहे.

ठाण्यात अवाजवी वीज बिलांविरोधात भाजपाची लोकचळवळ
ठाणे : आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेली असतांनाच अवाजवी वीज बिलांमुळे जनता हवालदिल झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला अवाजवी बिले पाठवू नका, त्यांची वीज खंडीत करु नका, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.
अवाजवी वीज बिलांविरोधात भाजपाने केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली लोकचळवळ सुरु केली आहे. याबाबत याचिकाही दाखल करण्यात आली आहे. केळकर यांनी विविध ठिकाणी वीज ग्राहकांच्या बैठका अधिका-यांच्या उपस्थितीत सुरु केल्या आहेत. यावेळी शेकडो ग्राहक त्यांच्या तक्रारी करत आहेत. त्यांनी आतापर्यंत सहा ठिकाणी बैठका घेतल्या आहेत.
सोमवारी बाळकूम येथील गृहसंकुलांच्या प्रतिनिधींची बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी वीज मंडळ अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारीबाबत मार्गदर्शन केले. शिबिर आयोजित करु न वीज बिलांची तपासणी करण्यात येईल असे अधिका-यांनी सांगितले.
वीज ग्राहकांना दिलासा देण्याचे काम वीज मंडळाने सुरु केले आहे. या बैठकीत वीज बिले दुरुस्त करा, वीज खंडीत करु नका, वीज बिलात सवलत द्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दंड आणि व्याजाची आकारणी करण्यात येणार नाही, असे अधिका-यांनी बैठकीत सांगितले. वीज मंडळाने तीन हप्त्यात बिल भरण्याची सवलत दिल्याची माहिती केळकर यांनी दिली.