पवारांच्या भूमिकेमुळे भाजपा विरोधकांना बळ
By Admin | Updated: May 13, 2017 00:48 IST2017-05-13T00:48:54+5:302017-05-13T00:48:54+5:30
पंजाबचा दाखला देत भाजपा दरवेळी जिंकू शकत नाही, असे सांगत धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र येण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

पवारांच्या भूमिकेमुळे भाजपा विरोधकांना बळ
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : पंजाबचा दाखला देत भाजपा दरवेळी जिंकू शकत नाही, असे सांगत धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र येण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनामुळे भाजपा विरोधकांना बळ चढले आहे. त्याचबरोबर मुस्लिमांनी भाजपाला मते दिल्याचा प्रचार खोटा असल्याचे सांगत पवार यांनी त्या समाजाचा पाठिंबा अद्यापही धर्मनिरपेक्ष गटांना असल्याचे दाखवून दिल्याने राष्ट्रवादी, समाजवादी पक्षासह काँग्रेसला भिवंडीच्या निवडणुकीत त्याचा फायदा मिळू शकतो, असा दावाही त्या पक्षाचे नेते खाजगीत करत आहेत.
अन्य पक्षांतून उमेदवार फोडून आपली स्वतंत्र आघाडी तयार करण्याचे भाजपाचे प्रयत्न भिवंडीत फसले. त्यामुळे त्यांनी कोणार्क आघाडीशी समझोता केला. पण जो काँग्रेस पक्ष कमकुवत होईल, अशी भाजपाची अपेक्षा होेती त्याच पक्षाने असंतुष्टांना सांभाळण्याची कसरत यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे अपेक्षेपेक्षाही अधिक भक्कमपणे तो पक्ष निवडणुकीत उभा राहिला. शिवाय समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीतील मतभेद दूर करून त्यांची आघाडी करण्यात यश मिळाल्याने या पक्षातील मतांच्या फाटाफुटीचे प्रमाण रोखण्यात यश आले. त्यामुळे धर्म निरपेक्ष आघाडी जरी उभी राहू शकली नसली, तरी भाजपाविरोधात, प्रसंगी त्यांनी समझोता केलेल्या कोणार्कविरोधात उभे राहणे इतर पक्षांना शक्य झाले.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, काँग्रेस एकत्र आले. पण समाजवादी पक्षातील फाटाफूट, विसविशीत काँग्रेस पक्षामुळे त्या आघाडीला यश मिळाले नाही, याकडे लक्ष वेधत पवार यांनी ते पक्ष राज्यात चांगली कामगिरी करतील, असेच अप्रत्यक्ष सूचित केले.