भाजपाचा उंट सचिवांच्या दालनात

By Admin | Updated: November 17, 2016 06:53 IST2016-11-17T06:53:33+5:302016-11-17T06:53:33+5:30

बेटकुळ्या फुगलेल्या या पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दालनावर कब्जा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

BJP's camel's secretariat | भाजपाचा उंट सचिवांच्या दालनात

भाजपाचा उंट सचिवांच्या दालनात

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत जेमतेम नऊ जागा असलेल्या भाजपाचे ४३ नगरसेवक विजयी झाल्याने बेटकुळ्या फुगलेल्या या पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दालनावर कब्जा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याखेरीज, महापालिका सचिवांच्या कार्यालयातही हातपाय पसरल्यामुळे सचिवांना आपले अ‍ॅण्टीचेंबर कर्मचाऱ्यांना बसण्याकरिता उपलब्ध करून द्यावे लागले आहे.
महापालिका निवडणुकीत मागीलवेळी आपली २७ जागांची ताकद दाखवणाऱ्या मनसेला भाजपाने यावेळी निवडणुकीत जोरदार फटका दिल्याने या पक्षाची प्रकृती नऊ जागांची तोळामासा झाली. राजकीय रणांगणात मनसेला धोबीपछाड दिलेल्या भाजपाने मनसेच्या दालनावर कब्जा केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ५३, भाजपाचे ४३ सदस्य आहेत. त्याखालोखाल मनसेचे ९, काँग्रेसचे ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २ सदस्य आहेत. शिवसेनेने आपले तळमजल्यावरील दालन संख्याबळाच्या ताकदीनुसार राखले आहे. भाजपाचे दालन हे पहिल्या मजल्यावर होते. मात्र, आता भाजपाने पहिल्या मजल्यावरील मनसेच्या प्रशस्त दालनाची मागणी केली असून त्याच्या शेजारील सचिव कार्यालयाची काही जागादेखील मागितली. भाजपाने तळमजल्यावरील काँग्रेसचे प्रशस्त दालन वापरावे, असा निर्णय महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत झाला होता. परंतु, पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा तळमजल्यावरील ‘शेजार’ नको असल्याने की काय, भाजपाने पहिल्या मजल्यावरील मनसे कार्यालयाचा हट्ट कायम ठेवला. अखेर, त्यांची मागणी मान्य करण्यात आली असून दालनाचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्सीखेचीमध्ये प्रकृती रोडावलेली असतानाही मनसेला तळमजल्यावरील काँग्रेसच्या दालनात हलवण्यात आले आहे. काँग्रेसला राष्ट्रवादीचे दालन उपलब्ध करून दिले आहे. या भानगडीत राष्ट्रवादी सध्या ‘बेघर’ झाली आहे. राजकीय पक्ष आपल्याकरिता कार्यालयाच्या जागा मिळवतील, यात वाद नाही. मात्र, जागा कमी झाल्याने सचिव कार्यालय कर्मचाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अखेर, काही कर्मचाऱ्यांना सचिवांच्या अ‍ॅण्टीचेंबरचा दालन म्हणून वापर करावा लागला आहे. महापालिकेच्या कारभारात सचिव कार्यालयाचे अनन्यसाधारण महत्त्व असून त्याच कार्यालयाच्या नशिबी अंग चोरून वावरण्याचे भोग आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's camel's secretariat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.