भाजपचे अशोक राऊळ यांचे नगरसेवकपद रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST2021-05-19T04:41:04+5:302021-05-19T04:41:04+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे नगरसेवक अशोक राऊळ यांनी निवडणूक विभागाला सादर ...

भाजपचे अशोक राऊळ यांचे नगरसेवकपद रद्द
ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे नगरसेवक अशोक राऊळ यांनी निवडणूक विभागाला सादर केलेल्या सत्य प्रतिज्ञापत्रात गुन्हेविषयक माहिती लपविली होती. या विरोधात शिवसेनेचे उमेदवार मंदार विचारे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने आता राऊळ यांचे नगरसेवक पद रद्द करून त्यांना सर्वोच्च न्यायालयात दादा मागण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. सोमवारी याबाबतचा निकाल न्यायालयाने दिला असल्याची माहिती महापालिकेच्या विधी विभागाने दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर सध्या संख्याबळ एकने कमी होऊन २२ वर आले आहे.
ठाणे महापालिकेची २०१७ रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यावेळेस राऊळ यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना शिवसेनेच्या मंदार विचारे विरोधात मैदानात उतरविले होते. त्यानंतर प्रभाग क्रमांक १२ ड मधून त्यांनी विजय संपादित केला होता. यानंतर त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी मंदार विचारे यांनी ठाणे न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. महापालिकेतील भ्रष्टाचाराप्रकरणी नंदलाल समितीने ठपका ठेवलेल्या गुन्ह्यांची माहिती राऊळ यांनी प्रतिज्ञापत्नात दिली नसल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता. या याचिकेवर १६ मार्च २०१९ मध्ये अंतिम सुनावणी झाली होती. त्यामध्ये त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे तसेच दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे मंदार विचारे यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात राऊळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचासंबंधी ठाणे न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असल्याची माहिती महापालिकेचे विधी विभागाचे अधिकारी मकरंद काळे यांनी दिली;
परंतु या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. येत्या आठ महिन्यांवर ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आल्या आहेत. त्यापूर्वीच राऊळ यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने येत्या निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसण्याची चिन्हेदेखील निर्माण झाली आहेत. भाजपचे ठाणे महापालिकेत सध्या २३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे; परंतु आता राऊळ यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने भाजपचे २२ नगरसेवक शिल्लक राहिले आहेत.