भाजपा कार्यकर्त्यांचा धुडगूस
By Admin | Updated: July 12, 2016 02:38 IST2016-07-12T02:38:38+5:302016-07-12T02:38:38+5:30
भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध तक्रारी करणाऱ्या तक्रारदाराच्या इमारतीत घुसून पोलिसांसमोर धुडगूस घालण्याचा प्रकार मेहतांच्या उपस्थितीत भाजपाच्या २००

भाजपा कार्यकर्त्यांचा धुडगूस
मीरा रोड : भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध तक्रारी करणाऱ्या तक्रारदाराच्या इमारतीत घुसून पोलिसांसमोर धुडगूस घालण्याचा प्रकार मेहतांच्या उपस्थितीत भाजपाच्या २०० कार्यकर्त्यांनी मीरा रोड भागात केला. तक्रारदाराच्या घरात घुसून काहींनी त्यांना मारहाण केली. मेहतांविरोधात सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हा प्रकार घडला. मेहतांच्या तक्रारीवरून तक्रारदारास खंडणीची मागणी, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक केली आहे. दरम्यान, दहशत पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई न करता उलट तक्रारदारालाच आरोपी केल्याचा आरोप विविध संघटनांनी केला.
मीरा रोडच्या कनकिया येथील लक्ष्मी पॅराडाइजमध्ये राहणारे राजू गोयल यांनी आमदार मेहताविरोधांत तक्रारी केल्या आहेत. त्यावरून चौकशी सुरू आहे. त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे. रविवारी रात्री सजी आयपी यांनी मेहतांच्या समर्थनार्थ टाकलेल्या फोटोंवर गोयल यांनी मेहतांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे स्वत: आमदार मेहतांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मीरा रोड पोलीस ठाण्याबाहेर जमले. दरम्यान, दोघे जण त्यांच्या घरी गेले. गोयल यांनी दार उघडताच त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. गोयल व त्यांच्या पत्नीने दार लावले व पोलिसांना कळवले. मेहतांसह जमाव इमारतीत शिरला. पोलिसांनी जमावाला वर जाण्यापासून रोखल्याने धुडगूस घातला. गोयल यांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर मेहता यांनी ठाण मांडले. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. मेहतांच्या तक्रारीनुसार गोयल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी सुनावली.